कोंढवा इमारत दुर्घटना प्रकरण; विपुल आणि विवेक अग्रवालला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

पुण्यातील कोंढवा इमारत दुर्घटना प्रकरणी विपुल अग्रवाल आणि विवेक अग्रवाल यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

pune wall collapse fir registered against builders
कोंढवा इमारत दुर्घटना प्रकरण

पुण्यातील कोंढवा परिसरात संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विपुल अगरवाल आणि विवेक अगरवाल यांना अटक केली होती. त्यांना आज, रविवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुण्याच्या कोंढवा येथे भर पावसात मध्यरात्री दीड वाजता आल्कन स्टायलस इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेनंतर प्रशासनाने ८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

यांच्यावर गुन्हे दाखल 

यामध्ये आल्चर स्टायल इमारतीच्या पाच भागीदार बिल्डर्स आणि शेजारील जागेवर बिल्डिंग उभारणाऱ्या कांचन डेव्हलपर्सच्या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आल्कन स्टायलसचे पाच भागीदार बिल्डर जगदीशप्रसाद अग्रवाल (६४), सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल (३४), राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल (२७), विवेक सुनिल अग्रवाल (२१), विपूल सुनिल अग्रवाल (२१) या पाच जणांविरोधत गुन्हा दाखल झाला आहे. त्याचबरोबर कांचन डेव्हलपर्सचे पंकज व्होरा, सुरेश शहा, रश्मीकांत गांधी यांच्यासह त्यांचे साईट इंजिनिअर, साईट सुपरवायझर आणि कंत्राटदाराच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. याशिवाय दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाखांची तर जखमींना २५ हजारांची मदत जाहीर करण्यात आली.

दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – अजित पवार

दरम्यान, या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत दोषी बिल्डर आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. ‘पुण्यातील कोंढवा येथे इमारतीची भिंत कोसळून १५ मजूरांचा मृत्यू झाला. याबाबत नियम ९७ अन्वये विधानसभेत सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी’, असे अजित पवार म्हणाले. यावर विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी ‘प्रश्नोत्तराच्या तासानंतर याबाबत चर्चा केली जाईल’, असे सांगितले.