LockDown: सूर्यनमस्कारानंतर जम्पिंग झपाक्; भरचौकात नागरिकांची परेड!

पुण्यातील बिबवेवाडी परिसरात सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांकडून पुणे पोलिसांनी योगा करून घेतला.

pune
पुणे

देशात लॉकडाऊन असतानाही लोकं अजूनही मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात आज सकाळी काही रहिवासी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असून पुणे पोलिसांनी मात्र त्यांची चांगलीच परेड घेतली. पुणे पोलिसांनी भरचौकात या नागरिकांना रांगेत उभे करून त्यांच्याकडून सूर्यनमस्कार आणि व्यायाम करून घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळायचे आहेत. जनसंपर्क टाळायचा आहे. घरातच थांबायचे आहे, असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत असूनही नागरिक मात्र विनाकारण घराबाहेर पडत आहेत. परंतू पुण्यात आज पोलिसांनी घेतलेल्या या परेडमुळे नागरिकांची सकाळच्या व्यायामाची चांगलीच हौस फिटली असेल, असेच म्हणावे लागेल.

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्याची हौस फिटली 

देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यातही महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यामध्ये मुंबईनंतर पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. अशा परिस्थितीत लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे अतिशय गरजेचे आहे. पुण्यात सध्या ४०० हून अधिक कोरोनाबाधित आहेत. मात्र पुणेकरांनी अजूनही कोरोनाला गांभिर्याने घेतले नसल्याचे चित्र बिबवेवाडीत सकाळी पाहायला मिळाले. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या या नागरिकांना पोलिसांनी एका रांगेत उभे राहून सूर्यनमस्कार घालावयास लावले. माईकवर पोलिसाने सूचना देत एक, दोन, तीन चार…, चार, तीन, दोन, एक म्हणत यांच्याकडून सूर्यनमस्कार करून घेतले. त्यानंतर जागेवरच उड्यादेखील मारायला लावल्या. जम्पिंग झपाक् म्हणतं पोलिसांनी या नागरिकांकडून व्यायाम करून घेतला. हा व्यायामाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे यापुढे कोणीही मॉर्निंग वॉकसाठी लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडताना हजारदा विचार करेल.

हेही वाचा –

धक्कादायक! कोरोना संशयितांचे क्वॉरंटाइनमध्ये लैंगिक चाळे