स्वदिच्छाच्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न; वडिलांचे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह

police Trying to give a different twist to sadichha sane missing case her fathers police investigation question mark

बोईसर : बोईसर येथील एमबीबीएस ची विद्यार्थीनी स्वदिच्छा साने हीची हत्या करून तिचा मृतदेह वांद्रे बॅंड स्टँडच्या समुद्रात फेकून दिल्याचा खळबळजनक कबुली जबाब या प्रकरणातील सुरवातीपासूनचा संशयीत आरोपी मिट्टू सिंग याने मुंबई गुन्हे शाखेला दिला आहे. मात्र स्वदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांना हे मान्य नसून हे प्रकरण कायमचे बंद करण्यासाठी पोलिस वेगळे वळण देत असल्याचा आरोप केला आहे.

बोईसर खोदाराम बाग येथे राहणारी स्वदिच्छा साने ही विद्यार्थीनी भायखळा येथील सर जे.जे.ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत होती.२९ नोव्हेंबर २०२१ रोजी तिसर्‍या वर्षाच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्यासाठी बोईसर येथील आपल्या घरातून निघालेली सदिच्छा साने परीक्षेला न जाता अचानक गायब झाली होती. या नंतर तिच्या पालकांनी बोईसर पोलिस स्टेशन येथे बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केल्यानंतर चौकशीत सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदिच्छा ही वांद्रे रेल्वे स्टेशनवर उतरून व त्यानंतर मध्यरात्री बॅंड स्टँड समुद्रकिनार्‍यावर जीवरक्षक मिट्टू सिंग याच्यासोबत सेल्फी घेतानाचे छायाचित्र समोर आले होते. त्यानंतर स्वदिच्छाच्या शोधासाठी हे प्रकरण बोईसर पोलिसांकडून वांद्रे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. मात्र अनेक महिने तपासात काहीच प्रगती होत नसल्याने वांद्रे पोलिसांकडून पुन्हा मुंबई गुन्हे शाखा ९ कडे सोपविण्यात आले होते.

स्वदिच्छा साने बेपत्ता प्रकरणी जीवरक्षक मिट्टू सिंग हा एकमेव शेवटचा साक्षीदार असल्याने त्याच्या सहभागाबाबत संशय दूर करण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर नार्को चाचणी आणि ब्रेन मॅपिंग चाचणी केली होती.या चाचणीच्या अहवालानंतर वस्तुनिष्ठ पुरावांच्या आधारावर आरोपीला अपहारणाच्या आरोपाखाली अटक करण्यात होती. मिट्टू सिंगला अटक केल्यानंतर या प्रकरणातील दूसरा आरोपी अब्बास अंसारी याला देखील अटक करण्यात आली होती. १४ महिन्यांपासून गूढ बनून राहिलेल्या स्वदिच्छा साने बेपत्ता प्रकरणात मुंबई गुन्हे शाखा युनिट ९ च्या अधिकार्‍यांनी संशयित आरोपी मिट्टू  सिंगची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अखेर आपण स्वदिच्छा सानेची हत्या करून तिचा मृतदेह बॅंड स्टँड समोरील समुद्रात फेकून दिल्याचा धक्कादायक कबुली जबाब दिला आहे. यानंतर पोलिसांनी आज सकाळपासूनच बँड स्टँड समुद्र आणि परिसरात शोध मोहीम सुरू केली आहे.

स्वदिच्छाच्या वडीलांचा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह

आपली मुलगी स्वदिच्छा साने ही बेपत्ता झाल्यानंतर बोईसर आणि वांद्रे पोलिसांनी सुरवातीपासूनच व्यवस्थित तपास करण्यात हयगय केल्याचा आरोप स्वदिच्छाचे वडील मनिष साने यांनी केला आहे. हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर एकमेव संशयित आरोपी मिट्टू सिंग याची सहा महिन्यांपूर्वी नार्को चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यामध्ये स्वदिच्छा सानेची हत्या केल्याचे समोर आले नव्हते. स्वदिच्छा परीक्षेला जाताना तिच्यासोबत असलेली बॅग, मोबाईल, अंगठी, घड्याळ, चप्पल, तिचे कपडे, चादर या वस्तूंचा अजून शोध लागलेला नसताना पोलिस स्वदिच्छाची हत्या झाल्याचा काढत असलेला निष्कर्ष आपल्याला मान्य नसल्याचे सांगून मनिष साने यांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.


पालघरची MBBS विद्यार्थिनी सदिच्छाच्या हत्येचा छडा; आरोपी मिट्टू सिंहला अटक