पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलिसाला मारहाण

प्रवेशद्वारावर वाहन आडवे लावणारा युवक ताब्यात

नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर वाहन आडवे लावणार्‍या युवकाला पोलिसांनी वाहन बाजूला लावण्यास सांगितले असता राग अनावर झाल्याने युवकाने पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.१९) रात्री घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर जगन्नाथ सानप (२६, रा. सारोळा, ता. निफाड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी (दि.१९) रात्री सिन्नरफाटा भागात उघड्यावर दारु पीत असलेल्या काही युवकांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ताब्यात घेत नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर थोड्याच वेळात ताब्यात घेतलेल्या एका युवकाचा मित्र ज्ञानेश्वर सानप पोलीस ठाण्यात आला. त्यावेळी त्याने वाहन पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर आडवे लावून आत जाण्यास निघाला असता कर्तव्यावर असलेल्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला वाहन बाजूला घेण्यास सांगितले. राग अनावर झाल्याने त्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलिसाला धक्काबुक्की केली. सरकारी कामकाजात हस्तक्षेप केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.