घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगरमध्ये आज राजकीय रणसंग्राम

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राजकीय रणसंग्राम

Subscribe

रामनवमीच्या पूर्वसंध्येला दोन गटात झालेल्या राड्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रविवारी राजकीय रणसंग्राम रंगणार आहे. महाविकास आघाडीने वज्रमूठ सभेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा मानस केला आहे, तर विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधार्‍यांनीही कंबर कसली असून सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्धार केल्याने आजचा दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय रणसंग्रामाचा रविवार ठरणार आहे.

मविआची वज्रमूठ सभा सत्ताधार्‍यांचा सावरकर गौरव

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभूतपूर्व बंडानंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागलेल्या महाविकास आघाडीची पहिली सभा आज रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्धार केलेल्या महाविकास आघाडीचा आजच्या सभेच्या माध्यमातून तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर आजची सभा ऐतिहासिक ठरण्यासाठी तीनही पक्षांचे नेते आणि पदाधिकारी झटत आहेत.

राज्यात भाजपविरोधात स्थापन झालेली महाविकास आघाडी ही केवळ सत्तेसाठी नव्हती हे दाखवून देण्यासाठी आघाडीने राज्यभरात सभांचे आयोजन केले आहे. त्यानुसार आघाडीची पहिली सभा रविवारी छत्रपती संभाजीनगरच्या खडकेश्वर येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होत आहे. सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी केली जात असतानाच शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्या आदल्या रात्री घडलेल्या दंगलीमुळे या सभेला परवानगी मिळणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. अखेर पोलीस प्रशासनाने या सभेला सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे सभेला मिळणार्‍या प्रतिसादाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

या सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार आल्यानंतर गेल्या ९ महिन्यांत प्रथमच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनुचित घटना घडली. मुंबईतील मालवणी परिसरातही असाच अनुचित प्रकार घडणार होता. या पार्श्वभूमीवर या सभेत आघाडीच्या नेत्यांकडून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या आणि आघाडीच्या नेत्यांमागे लावलेले चौकशीचे शुक्लकाष्ठ यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर आघाडीकडून जोरदार हल्लाबोल होऊ शकतो.

- Advertisement -

ठाकरे गटासाठी सभा महत्त्वाची
कोकणपाठोपाठ मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मराठवाड्याने शिवसेनेला राजकीय ताकद दिली. नारायण राणे, राज ठाकरे यांच्या बंडाचा कोणताही परिणाम मराठवाड्यावर झाला नव्हता, मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. त्यामुळे मराठवाड्यात आपले आमदार निवडून आणण्याचे मोठे राजकीय आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. त्यासाठी ही सभा ठाकरे गटासाठी महत्त्वाची आहे.

महाविकास आघाडीच्या पुढील सभा
१६ एप्रिल – नागपूर
१ मे – मुंबई
१४ मे – पुणे
२८ मे – कोल्हापूर
३ जून – नाशिक

सत्ताधार्‍यांचा सावरकर गौरव

भाजप-शिवसेनेची ‘सावरकर गौरव यात्रा’ रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणार आहे. समर्थनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यापासून ते गणेश मंदिरापर्यंत ही गौरव यात्रा काढली जाणार असल्याचे राज्याचे केंद्रीय अर्थमंत्री भागवत कराड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

ही गौरव यात्रा रविवारी संध्याकाळी ५ वाजता निघणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, आम्ही महापुरुषांच्या गौरवासाठी यात्रा काढत आहोत. ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा हुंकार भरला त्याच मैदानावर रविवारी महाविकास आघाडीची सभा होत असून तो बाळासाहेबांचा अवमान आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सतत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करीत असून त्यांचा निषेध आम्ही नोंदविला आहेच.

सोबतच सावरकरांचे जाज्वल्य देशप्रेम व हिंदुत्वाची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी भाजप आणि शिवसेनेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा रविवारी सायंकाळी शहरातून काढण्यात येणार आहे. समर्थनगरातील सावरकर यांच्या पुतळ्यास वंदन करून या यात्रेस सुरुवात होईल, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला मराठवाडा यात्रा प्रमुख संजय केणेकर व आमदार संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासह सहकार मंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, डॉ. राम बुधवंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -