एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप; शरद पवार, देवेंद्र फडणवीस आहेत कुठे?

विधान परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याचे म्हटले जातेय

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूंकप निर्माण झाला आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना पक्षश्रेष्ठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर नाराजी व्यक्त करत बंडखोराची भूमिका घेतली आहे. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातच्या सुरतमधील एका हॉटेलमध्ये २० पेक्षा जास्त आमदारांसोबत नॉट रिचेबल होते. विधान परिषदेत शिवसेनेची फुटलेली मते आणि एकनाथ शिंदे समर्थक नॉट रिचेबल असल्यामुळे ठाकरे सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. अशा परिस्थिती आता महाविकास आघाडीत सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले सर्व पूर्णनियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार सध्या दिल्लीत आहेत.

राज्यात विधान परिषद निवडणुका संपताच आता सर्वांचे लक्ष 18 जुलैला होणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती निवडणुकीकडे लागून आहे. यासाठी विरोधकांची जुळवाजुळव सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. यानिमित्त शरद पवार कालपासून दिल्लीत आहेत. मात्र महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बघता शरद पवारांनी आपले कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळतेय. रोज सकाळपासून सुरु होणारा शरद पवारांच्या बैठकांचा सपाटा आज रद्द झाला आहे. (political crisis in maharashtra where is ncp chief sharad pawar and bjp leader devendra fadanvis)

शरद पवारांच्या नेहमी गजबजलेल्या दिल्लीच्या बंगल्याबाहेरही शांतता आहे. दुपारी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. मात्र बैठकीत नेमका कोणता निर्णय घेतला जाऊ शकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर शरद पवार दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही तासांत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांच्या चाणक्या नितीमुळे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला. आता शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर दिल्लीत आता जे. पी. नड्डा अमित शाह यांच्यात बैठकांची सिलसिला सुरु झाला आहे. तर दुसरीकडे राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही बैठकांचे सत्र सुरु झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालादरम्यान शिवसेना नेते आणि ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहे. त्यांच्यासोबत ३० आमदार असल्याची माहिती समोर आली येतेय. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आणि इतर अपक्ष आमदार असल्याची माहितीही समोर येतेय.यातील २५ हून अधिक आमदार सूरतमधील हॉटेलमध्ये असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जातोय. फडणवीस भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस दिल्लीहून अहमदाबादमध्ये रवाना होणार आहेत.

विधान परिषद निवडणुकीदरम्यान शिवसेनेत नाराजी नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे पक्ष श्रेष्ठींवर नाराज असल्याचे म्हटले जातेय. दरम्यान त्यांच्यासोबतचे २० हून अधिक आमदारही नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा बंगल्यावर पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीत सर्वाधिक आमदार अनुपस्थित असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे. यात नाराज शिंदेंची समजूत काढण्यासाठी संजय राठोड आणि रविंद्र फाटक सुरतला रवाना झाले आहेत. त्यामुळे शिंदे यांची नाराजी दूर होते का? किंवा ते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


ठाकरे सरकारमध्ये भूकंप; ठाणे, कोकण, मराठवाड्यातील 25 आमदारांसह एकनाथ शिंदे गुजरातमध्ये