वर्षा बंगल्याच्या भिंतीवर राजकीय वादाच्या रेषा

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याच्या भिंतीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिलेला दिसून आल्यामुळे चर्चेचे काहूर माजले आहे. महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले आहेत. सत्तापालट झाल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना ‘वर्षा’ बंगला सोडावा लागला. या बंगल्यावर आता उद्धव ठाकरे रहायला जाणार आहेत.

उद्धव ठाकरे ‘वर्षा’वर राहायला जाण्याअगोदर वर्षा बंगल्यावरुन महाराष्ट्रात पुन्हा राजकीय वादविवाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण वर्षा बंगल्याच्या एका भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात काही वाक्ये लिहिली गेल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर सध्या हा बंगला सार्वजनिक विभागाकडे आहे. उद्धव ठाकरे लवकरच या बंगल्यावर राहण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही अधिकारी या बंगल्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, यावेळी एक धक्कादायक प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. वर्षा बंगल्याच्या एका भिंतीवर उद्धव ठाकरे यांचा तिरस्कार करणारी वाक्ये लिहिलेली आढळून आली. त्यामुळे या प्रकारावरुन भाजप-शिवसेनेत पुन्हा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्षा बंगल्याच्या भिंतीवर काय लिहिले आहे. हे मी पाहिलेले नाही. भिंतीवर लिहिण्यात आलेले मजकूर रंग मारुन मिटवता येतात. पण यामुळे हा मजकूर लिहिणार्‍याचे तोंड मात्र काळे झाले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी या प्रकरणाचा निषेध केला आहे.

काय लिहिले आहे भिंतीवर?
‘हु इज यू टी? यू टी इज मीन यू टी वाईट आहेत. शट अप’, अशाप्रकारचे वाक्ये भिंतीवर लिहिण्यात आली आहेत.