मतदानाआधीच राजकीय होळी पेटली

भाजपचे पोलिसांसमोर पैसे वाटप - धंगेकर,पायाखालून वाळू सरकल्यानेच आरोप - फडणवीस

सत्ताधारी शिवसेना-भाजप युती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडीसाठी ‘लिटमस टेस्ट’ ठरणार्‍या कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज, रविवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत मतदान होत आहे, परंतु या मतदानाआधीच्या पूर्वसंध्येला शनिवारी राजकीय होळी पेटल्याचे चित्र राजकारणात पहायला मिळाले.

कसबा पेठ येथे भाजप पदाधिकार्‍यांकडून पोलिसांच्या उपस्थितीतच पैसे वाटप होत असल्याचा खळबळजनक आरोप करत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी येथील गणपती मंदिराबाहेर आपल्या कार्यकर्त्यांसमवेत उपोषण केले. पैसे वाटपाचे प्रकार याठिकाणी घडत असल्याची एक चित्रफीतही समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली, तर हा निव्वळ राजकीय स्टंट असल्याचे प्रत्युत्तर भाजपच्या गोटातून देण्यात आले. यावरून सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने याठिकाणी राजकीय होळी पेटण्यास सुरुवात झाली होती. अखेरीस पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तब्बल पाच तासांनी धंगेकरांनी आपले उपोषण मागे घेतले.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक महाविकास आघाडी आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. पोटनिवडणुकीतील प्रचारात जोरदार चुरस दिसल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या दोन जागांच्या निकालाकडे लागले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता या पोटनिवडणुकीतील निकाल युती आणि आघाडीसाठी राजकीयदृष्ठ्या महत्वाचा ठरणार आहे.

भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे कसबा पेठ, चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने कसबा पेठमधून हेमंत रासने तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. विद्यमान भाजप खासदार गिरीश बापट यांनी अनेक वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, मात्र पोटनिवडणुकीत काँग्रेसने मोठे आव्हान उभे केल्याने येथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

चिंचवडमध्ये भाजपने दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने नाना काटे यांना उभे केले आहे. याशिवाय २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जवळपास सव्वालाख मते घेणारे राहुल कलाटे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून येथे तिरंगी लढत होत आहे.

राज्यात आठ महिन्यांपूर्वी सत्तांतर झाल्यानंतर प्रथमच पोटनिवडणुकीच्या निमित्ताने युती आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या पोटनिवडणुकीत दोघांनी आपली ताकद आपापल्या उमेदवारांच्या मागे उभी केली आहे. त्यामुळे येथील मतदान आणि निकालाची उत्कंठा वाढली आहे. दरम्यान, पोटनिवडणूक सुरळीत पार पडावी म्हणून यंत्रणा सज्ज झाली आहे.

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ
एकूण उमेदवार : १६
मतदारांची संख्या : २ लाख ७५ हजार ६७९
मतदान केंद्रांची संख्या : २७०
२०१९ मधील मतदान : ५१.५४ टक्के

चिंचवड विधानसभा मतदारसंघ
एकूण उमेदवार: २८
मतदारांची संख्या : ५ लाख ६८ हजार ९५४
मतदान केंद्राची संख्या : ५१०
२०१९ मधील मतदान : ५३.५९ टक्के

हा एक निव्वळ राजकीय स्टंट
काँग्रेसचे उपोषण म्हणजे हा एक निव्वळ राजकीय स्टंट आहे. सरळ हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की आज कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येत नाही. हे माहीत असताना अशाप्रकारचा स्टंट करून एक नवीन प्रकारे प्रचार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पायाखालून जेव्हा वाळू निघून जाते, त्यावेळी असे स्टंट केले जातात. हे आचारसंहितेचे पूर्ण उल्लंघन आहे. पैसे वाटणे ही संस्कृती काँग्रेस, राष्ट्रवादीची आहे. भाजपची नाही.
– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

फडणवीसांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय लागली आहे. ते विरोधी पक्षनेते होते तेव्हाचे फडणवीस आणि आत्ताचे फडणवीस यात खूप फरक दिसतो आहे. त्यांना स्टंट करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हा छंद का जडला आहे, मला माहिती नाही. देवेंद्र फडणवीस इतक्या दिवसांनी सनसनाटी निर्माण करून काय सांगू इच्छित आहेत?
– संजय राऊत, खासदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)