नागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेता आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आयुष्यात नेहमीच कोणत्या ना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांना हसतमुखाने तोंड देऊन त्यावर मात करून पुढे जाणे ही जीवन जगण्याची कला असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. (politics is a sea of unsatisfied souls says BJP leader nitin gadkari in nagpur news)
‘आयुष्य जगण्याचे 50 सुवर्ण नियम’ या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. अनेक वर्षांपासून नितीन गडकरी राजकारणात सक्रिय आहेत. मात्र, तरीही राजकारण हे कायम असंतुष्ट व्यक्तींनीच भरलेले असते. राजकारणात सगळेजण कायमच दुःखी असतात. आणि आपल्याकडे सध्या जे कोणते पद असेल, त्यापेक्षा वरच्या स्तरावरचे पद सगळ्यांना हवे असते. म्हणजेच उपमुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री व्हायचं असतं, आणखी कोणाला आहे त्या पदापेक्षा मोठे पद हवे असते, असेही ते म्हणाले. दरम्यान, गडकरी यांच्या या वक्तव्यावरून आता चर्चा सुरू झाली असून वेगवेगळे तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा – Maharashtra Politics : पराभवासाठी ईव्हीएम नाही तर…; कॉंग्रेसचेच नेते नाना पटोलेंवर भडकले
आयुष्य म्हणजे तडजोड, अडचणी, मर्यादा आणि विरोधाभासाचा खेळ आहे. माणूस कोणत्याही क्षेत्रात असो, त्याचे जीवन कायमच आव्हानांनी भरलेले असते. पण, या समस्यांवर मात करण्यासाठी सगळ्यांनीच जीवन जगण्याची कला आत्मसात केली पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.
यावेळी राजस्थानातील एका कार्यक्रमाची त्यांनी आठवण काढली. याच कार्यक्रमात त्यांनी राजकारणाबाबत टिप्पणी केली होती. ते म्हणाले होते की, राजकारण हे असंतुष्टांचं क्षेत्र आहे. इथे येणारा प्रत्येक माणूस दुःखी आहे. जो नगरसेवक बनतो, त्याला त्याची आमदारपदाची संधी हुकल्याचे दुःख असते, आमदार मंत्रीपद न मिळाल्याने निराश असतो, किंवा जे मंत्रीपद मिळाले आहे, ते महत्त्वाच्या खात्याचे नसल्याचे दुःख असते. तर मुख्यमंत्रिपदासारखे महत्त्वाचे पद मिळूनही तो देखील आनंद नसतो, कारण हायकमांड कधी पद सोडायला सांगेल, याचा काही नेम नसतो.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी आपल्या आत्मचरित्रात एक सुंदर वाक्य लिहिल्याचे गडकरी यांनी सांगितले. निक्सन म्हणतात, जेव्हा एखादी व्यक्ती पराभूत होते, तेव्हा तो नष्ट होत नाही. तर जेव्हा तो ते काम सोडून देतो, तेव्हा ती व्यक्ती संपते. सुखी जीवन जगायचे असेल तर संस्कार गरजेचे आहेत, असेही गडकरी म्हणाले. जीवन जगण्याचे आणि ते यशस्वीरित्या जगण्याचे स्वतःचे नियम त्यांनी यावेळी सांगितले. (politics is a sea of unsatisfied souls says BJP leader nitin gadkari in nagpur news)
हेही वाचा – Mumbai Local : पश्चिम रेल्वेकडून 13 एसी लोकलच्या फेऱ्या सुरू; मात्र या कारणांमुळे प्रवासी संतप्त
Edited by : Ashwini A. Bhatavdekar