Homeमहाराष्ट्रPolitics: नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, 2014 साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? मल्लिकार्जून...

Politics: नरेंद्र मोदी खोट्यांचे सरदार, 2014 साली दिलेल्या गॅरंटीचे काय झाले? मल्लिकार्जून खर्गेंचा घणाघात

Subscribe

लोणावळा: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच मोदींची गॅरंटी, मोदीची गॅरंटी असे बोलत असतात, त्यांच्या बोलण्यात मी, मी पणा जास्त असतो. आपण ‘आम्ही भारताचो लोक’ असे म्हणतो परंतु मोदी मात्र मी, मी असेच म्हणतात. नरेंद्र मोदी सातत्याने खोटे बोलत असतात, ते खोट्यांचे सरदार आहेत. मोदींनी आजपर्यंत दिलेली एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. 2014मध्ये मोदींनी काळा पैसा आणून प्रत्येकाला 15 लाख रुपये देण्याची, दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याची, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, या गॅरंटी दिल्या होत्या, या मोदी गॅरंटीचे काय झाले? असा सवाल काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केला आहे. (Politics Narendra Modi Lord of lies what happened to the guarantee given in 2014 Mallikarjun Kharge s  statement)

लोणावळ्यात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीराचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ऑनलाईन केले. यावेळी ते बोलत होते. खर्गे पुढे म्हणाले की, काँग्रेसप्रणित युपीए सरकारने 2004 ते 2014 या काळात अन्न सुरक्षा कायदा आणला, रोजगार हमीचा मनरेगा कायदा केला, सर्व शिक्षा अभियान आणले, माहिती अधिकार कायदा आणला. मोदी सरकारने दहा वर्षांत काहीही दिलेले नाही. नरेंद्र मोदी, भाजपा, आरएसएसने देशाला स्वातंत्र दिलेले नाही. काँग्रेस पक्ष, महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार पटेल, लोकमान्य टिळक या महान नेत्यांनी देशाला स्वातंत्र मिळवून दिले. स्वातंत्र्य चळवळीत भाजपाचे काहीच योगदान नाही.

काँग्रेस पक्षाचा जन्म मुंबईत झाला आहे, आज या पक्षाला 139 वर्षे झाली आहेत. काँग्रेस पक्ष खोटे बोलणारा पक्ष नाही. लोकांच्या हितासाठी व स्वातंत्र्यासाठी या पक्षाचा जन्म झाला आहे. समाजात फूट पाडण्यासाठी काँग्रेस पक्ष नाही. एकता व सामाजिक सौहार्द जपणारा पक्ष आहे. मुंबईकडे देशाचे लक्ष लागलेले असते, मुंबई व पुणे शहराने सामाजिक सौहार्दाचे काम केले आहे. आपली लढाई मोदी व भाजपाविरोधात आहे तशीच ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या संस्थाविरोधातही लढाई करावी लागत आहे. निवडणुकीसाठी घराघरात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवा. या निवडणुकीत सर्वांनी हिरीरीने भाग घेत एकजूट होऊन निवडणुका लढवा व काँग्रेसला विजयी करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाराष्ट्रातील वातावरण काँग्रेस पक्षासाठी अनुकुल आहे. सर्व राज्याचा दौरा करून आढावा घेतल्यानंतर, आता शिबीर घेतले जात आहे. महाविकास आघाडी राज्यातील लोकसभेच्या सर्व 48 जागा लढवत आहेत. आजचे राज्यातील वातावरण पाहता मविआ सर्वात जास्त जागा जिंकेल. केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवली आहेत. निवडणुकीच्या तोंडावर भाजपा कोणत्याही थराला जाईल, परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने लढून विजय मिळवावा, असे आवाहन रमेश चेन्नीथल्ला यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीची परिस्थिती आपल्यासाठी ‘करा किंवा मरा’ अशी आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा लागणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस व मविआला चांगले वातावरण आहे, परंतु त्यासाठी लोकांच्या घरापर्यंत जावे लागणार आहे. मतदार याद्या अद्ययावत कराव्या लागणार आहेत. बुथ लेवलपर्यंत काम करा, बीएलए चे काम निवडणुकीत सर्वात महत्वाचे आहे, त्यांच्या नियुक्त्या करा. भारतीय जनता पक्षाच्या तोडफोडीच्या व जाती धर्मात भांडणे लावणाऱ्या प्रवृत्तीला लोक कंटाळले आहेत. सर्वांनी एकजुटीने काम केले तर काँग्रेसला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही.

लोणावळ्याच्या शिबिरात ठराव मांडून ते मंजूर करण्यात आले. ते ठराव खालील प्रमाणे..

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलेला ठराव.

भाजपाने ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचा वापर करुन पक्ष फोडण्याचे काम केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून पाडले. विरोधी पक्षातल्या नेत्यांना फोडून विरोधी पक्षच गिळंकृत करण्यात आले. या गैरकृत्यामध्ये राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाला काळीमा फासत त्यांना मदत केली. आज तर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस आणि अखिल भारतीय युवक काँग्रेसची बँक खाती गोठवली आहेत. हा फक्त खाती गोठवण्यापुरता मर्यादीत नाही हा लोकशाही आणि संविधानाचा गळा दाबण्याचा प्रकार असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत आहे. माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी या ठरावाला अनुमोदन दिले व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने हा ठराव एकमताने मंजूर केला.

दुसरा ठराव.-

केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवून हुकुमशाही वृत्तीने काम करत आहे. मोदी सरकार आपल्या धोरणांमधून देशातील गरीब, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, अल्पसंख्यांक, शेतकरी, तरूण, महिला या सर्व समाजघटकांवर अन्याय करत आहे. देशातील हजारो शेतकरी दोन वर्षापूर्वी काळे कृषी कायदे मागे घ्यावेत आणि शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी वर्षभर आंदोलन करत होते. या आंदोलनात जवळपास एक हजाराहून अधिक शेतक-यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सरकारने हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते पण ते पाळले नाही त्यामुळे दोन वर्षानंतर पुन्हा लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.

सरकार त्यांचे आंदोलन दडपून टाकण्यासाठी त्यांच्या मार्गात खिळे ठोकत असून रस्ते बंद करून शेतक-यांवर अश्रू धुरांची नळकांडी फोडत आहे. पेलेट गन्सचा वापर करत आहे. यात शेकडो आंदोलक शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत. आपले नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्याबरोबर हमी भावाचा कायदा करू असे सांगितले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी खंबीरपणे शेतक-यांच्या पाठीशी उभी असून शेतक-यांचा आवाज दडपणा-या केंद्रातील मोदी सरकारचा धिक्कार करत आहे. हा ठराव आमदार संग्राम थोपटे यांनी मांडला तर विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे प्रतोद आ. सुरेश वरपुडकर यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एकमताने हा ठराव मंजूर केला.

या शिबीराला प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव मोघे, गोवा, दीव दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, अमित देशमुख, सुनिल केदार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, AICC सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस प्रमोद मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केले.

(हेही वाचा: Dhangar Reservation : धनगर समाजाची एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी हायकोर्टाने फेटाळली)