(Polling in Parli) मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अन्न आणि नागरीपुरवठामंत्री धनंजय मुंडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या रडारवर आहेत. अशातच त्यांनी अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दंडेलशाही केल्याचा आरोप केला जात आहे. याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Jitendra Awhad targets Dhananjay Munde by sharing another video)
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष वाल्मीक कराड याचाही कथित सहभाग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती म्हणून ओळखला जातो. म्हणूनच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विरोधकांनी लावून धरली आहे. यासाठी सत्ताधारी आमदारांसह विरोधकांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेटही घेतली होती. तथापि, धनंजय मुंडे यांना खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभय दिले आहे. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने सध्या तरी मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा – Ajit Pawar : कर्जमाफीचा विषय माझ्या भाषणात कधी ऐकला का? अजित पवारांच्या वक्तव्याने शेतकरी चिंतेत
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात विधासभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी करुणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणूक जिंकल्याचा आरोप करुणा मुंडे यांनी या याचिकेत केला आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनेक प्रकारची माहिती दडवल्याचा दावा करतानाच मतदान केंद्रे ताब्यात घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आपले धनंजय मुंडे यांच्यासोबत कायदेशीर लग्न झालेले आहे, असा दावा करुणा मुंडे यांचा दावा आहे.
आता एनसीपी एसपीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला आहे. काल, शुक्रवारी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ‘गजाभाऊ’ या नावाने केलेली पोस्ट पुन्हा शेअर करत डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आल्याचा दावा केला आहे. बोटावर शाई लावायची आणि मतदाराने बाहेर जायचे, मतदान केंद्राच्या आतमध्ये बटन दाबण्याचे काम एक गँग करायची. काही ठिकाणचे व्हिडीओ आहेत. पण कोण काय करणार? हे कायद्याचे राज्य आहे, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.
तर, शुक्रवारी रात्री उशिरा आणखी एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. संपूर्ण हिंसक मार्गाने हत्यारे, गुंड आणि ताकदीच्या जोरावर पूर्णपणे बूथ कॅप्चर, विरोधक उमेदवाराला दमदाटी मारहाण, उमेदवाराच्या अंगरक्षक पोलिसालाही दमदाटी, नागरिकांना मतदान करताना आडकाठी आणि मारहाण, विरोधक उमेदवाराच्या समर्थकांना मारहाण, मतदान कोणी करायचे आणि कोणी नाही करायचे हे तेच ठरवणार… अशा निवडणुका तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुद्धा होत नसतील, अशी टीका त्यांनी केली आहे. (Polling in Parli: Jitendra Awhad targets Dhananjay Munde by sharing another video)
हेही वाचा – MP Crime News : लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या, फ्रीज बंद केल्यावर पसरली दुर्गंघी आणि झाला अलगडा