Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पूजा चव्हाणला ठाकरे सरकार न्याय देणार का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

पूजा चव्हाणला ठाकरे सरकार न्याय देणार का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलच ढवळून निघालं आहे. या प्रकरणात शिवसेनेचा मंत्री असल्याचं बोललं जात आहे. यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. पूजा चव्हाणला ठाकरे सरकार न्याय देणार का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे सरकार संवेदनशील नाही आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार निर्माण करणारे शरद पवार यांना आवाहन करतो की त्यांनी या प्रकरणात न्याय द्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. कारण त्यांनी नेहमीच अन्यायाच्या विरोधात आवाज उठवला आहे. मात्र, या वर्षभरामध्ये या सरकारच्या काळात न्याय मिळत नाही आहे. एक मंत्री १५ वर्षे एका महिलेशी संबंध ठेवतो. जाहीरपणे कबुली देतो, की माझ्यापासून या महिलेला दोन मुलं झालेली आहेत. त्यांना माझं नाव दिलेलं आहे. यावर कोणतीच कारवाई नाही. एक मंत्री आपल्या बंगल्यावर नेऊन खूर्ची टाकून मारहाण करायला लावतो. सर्व फुटेज मिळालं पण कोणतीच कारवाई नाही. एक मंत्री पोलिसांना मारहाण केल्यानंतर खालच्या कोर्टात शिक्षा होते. अपिलात गेलेत. पण कोणतीच कारवाई नाही. एक मंत्री ज्यांचे अत्यंत जवळचे नातेवाईक ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहेत. पण कोणतीच कारवाई नाही. मोठी यादी आहे, या सर्वांवर कारवाई करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

मला असं वाटतं की पूजा चव्हाण प्रकरणाने हे सगळे विषय ऐरणीवर आले आहेत. सर्वसामान्यांना तुम्ही सुरुक्षित आहात असं वाटायला हवं. मात्र, पूर्ण महाराष्ट्र असुरक्षित आहे. रोज किमान ४ महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. प्रामुख्याने मतीमंद मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलं असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. संवेदनशीलता संपली? सत्तेसाठी काहीही करणार का? असा परखड सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे असलेल्या शक्तींचा वापर करुन चौकशी करायला हवी. लोकांमध्ये चर्चा आहे की या प्रकरणात मंत्री आहे. तर त्याची चौकशी करायला हवी आणि त्याचा राजीनामा घ्यायला हवा. घटनास्थळी दोन जण सापडले त्यांना अटक केली आणि सोडून दिलं. चाललंय काय? त्यांना पकडा आणि विचारा तुम्ही तिथे काय करत होता. सगळं बाहेर पडेल. मोबाईल सापडला आहे आता लॅपटॉपही सापडला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा – Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांची गाडी मंत्रालयात, मंत्री मात्र नॉट रिचेबल


 

- Advertisement -