केंद्र सरकारची मोफत धान्याची घोषणा ठरली फसवी

शिधा पत्रिका नसलेल्या असंख्य नागरिकांना रेशनवर अल्पदरात मिळणाऱ्या धान्याला मुकावे लागणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

Ration Card
शिधा पत्रिका

गरिबांना मोफत धान्य देण्याची केंद्र सरकारची घोषणा ही केवळ फसवी ठरली आहे. जिल्हा पातळीवर यासंबंधी कुठलेही कार्यालयीन आदेश आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील गरिबांचा मोठा भ्रमनिरास होणार आहे. दरम्यान, शिधा पत्रिका नसलेल्या असंख्य नागरिकांना रेशनवर अल्पदरात मिळणाऱ्या धान्याला मुकावे लागणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

गरिबांसाठी दुष्काळात तेरावा महिना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी देशातील ८० कोटी जनतेला एक एप्रिलपासून तीन महिन्यांचे धान्य मोफत मिळणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोरोनामुळे रोजगार गेलेले आणि आधीच गरीब जीवन जगणाऱ्या कोट्यावधी जनतेमध्ये आनंद पसरला. परंतु हा आनंद आता अल्पायुषी ठरणार आहे. कारण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता या संदर्भात कुठलेही कार्यालयीन आदेश आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच दोन रुपये किलो प्रमाणे गहू तर ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ उपलब्ध होणार आहे. पूर्वी एक महिन्याचा शिधा एकावेळी मिळत, असे त्याऐवजी तीन महिन्याचा एक वेळी घेण्याची सवलत सर्वानाच देण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी सांगितले.

आदेश नसल्याने पुरवठा विभागचे हात वर

तालुक्यात अनेक गरीब कुटुंबाकडे शिधा पत्रिका नसल्याचे पुढे येत आहे. जिल्ह्यात तर ही संख्या शेकडोंच्या घरात आहे. अनेकांनी नवीन शिधा पत्रिकेसाठी अर्ज केला. तर अनेकांनी विभक्त होण्यासाठी आपल्या शिधा पत्रिका जमा केल्या आहेत. तर काहींच्या हरवल्या आहेत. त्यामुळे आशा सर्व गरीब कुटुंबांपुढे रेशन वरील शिधा कसा मिळवावा? हा प्रश्न  उभा आहे. आता संचारबंदीच्या काळात महसुलचे कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनात गुंतलेले आहेत. त्यामुळे नवीन शिधा पत्रिका तयार करण्याचे काम बंद आहे. मात्र, शिधा पत्रिका नाही. परंतु ज्यांची नावे रेशन दुकानदाराकडील यादीत असेल तर त्यांना शिधा मिळेल. त्यांची अडवणूक केली जाणार नसल्याचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी स्पष्ट केले. इतर लोकांसाठी देखील शासनस्तरावर काही प्रयत्न करता येतील का? हे पाहणार असल्याचेही ते म्हणाले.

पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा

या आपत्तीच्या काळात कुणीही वंचित राहणार नाही याचे पुरेपूर प्रयत्न शासन स्तरावर घेण्यात येत आहेत. ग्रामपंचायत आणि पालिका पदाधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे. आपापल्या प्रभागातील शिधा पत्रिका नसलेल्या नागरिकांची त्यांनी यादी करावी. दानशूर व्यक्ती, समाजसेवी संस्था मदत देण्यास तयार आहेत. त्यांच्याशी समन्वय साधून सर्वांना धान्य पोचविले जाईल.  -प्रशांत पाटील, तहसीलदार, श्रीरामपूर

माझ्यासारख्या असंख्य गरीब कुटुंबाकडे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे शिधा पत्रिका नाही. कोरोनामुळे रोजगारही बंद आहे. गरिबीमुळे दररोज चूल कशी पेटवावी ही भ्रांत आहे. त्यातच शासनाकडून सवलतीच्या दरात मिळणारा शिधाही मिळू शकणार नसल्याने आम्ही आता कोणाच्या तोंडाकडे पहायचे. आमच्यासारख्या गरिबांसाठी सरकारने काही पाऊले उचलावीत.  – अमोल सोनवणे, नागरिक, वॉर्ड नो. २, श्रीरामपूर


हेही वाचा – महाराष्ट्रात करोना बाधितांची संख्या ३०२ वर, एकट्या मुंबईत ५९ रुग्ण