संभाजीराजे राज्यसभेवर जाणार का?

Sambhaji Raje Chhatrapati declares i will independently contest Rajya Sabha elections

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या 6 सदस्यांचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक प्रक्रिया होणार आहे. यातील एका जागेवरून संभाजी राजे निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबात कोल्हापूरमध्ये खासदार शरद पवार यांनी विधान केले आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, डॉ. विनय सहस्रबुद्धे, डॉ. विकास महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, शिवसेनेचे नेते संजय राऊत निवृत्त झाले आहेत. तर राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित झालेले छत्रपती संभाजीराजे व डॉ. नरेंद्र जाधवसुद्धा निवृत्त झाले आहेत. यात भाजपकडून मंत्री पीयूष गोयल, डॉ. विनय सहस्रबुद्धे यांना, शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी एकत्र राहिली तर भाजपच्या दोनच जागा निवडून येतील. त्यामुळे यातील एका जागेवरून संभाजी राजे निवडणूक लढवण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी देखील राज्यसभेत त्यांचा सहकारी आहे. ज्यावेळी महाराष्ट्राचे काही प्रश्न राज्यसभेत येतात तेव्हा महाराष्ट्रातील सदस्यांना बोलावून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येण्याची भूमिका आम्ही घेतो. अशा कामांमध्ये संभाजीराजेंचे सहकार्य आम्हाला नेहमी मिळाले आहे. पण त्यांचा कार्यकाळ संपत असताना त्यांना पुन्हा पाठिंबा देण्याविषयीचा निर्णय केवळ एका पक्षाचा नाही. त्यासाठी आम्हाला काँग्रेस आणि शिवसेनेला विचारावे लागेल. त्यामुळे शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान खासदार संभाजीराजे राजकारणात प्रवेश करणार आहेत. याबाबत आपली भूमीका ते 12 मेला पुण्यात मांडणार आहेत. याबद्दल मी राजकारणात प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे. पुढे काय करायचे हे माझ्या डोक्यात ठरलेले आहे, त्यामुळे 12 तारखेला ते जाहीर करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले.