घरताज्या घडामोडी'या खेकड्याच्या नांग्या मोडा' तानाजी सावंताविरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

‘या खेकड्याच्या नांग्या मोडा’ तानाजी सावंताविरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी

Subscribe

शिवसेनेचे नेते, माजी जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला साथ देऊन शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केले. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यात तानाजी सावंत यांच्याविरोधात बॅनरबाजी करुन शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात तानाजी सावंत यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद येथे मराठवाड्यातील आमदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला देखील सावंत यांनी दांडी मारली आहे.

तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीची सरशी होत असताना उस्मानाबादमध्ये मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाला. राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाच्या अस्मिता कांबळे या जि.पच्या अध्यक्षा तर तानाजी सावंत यांच्या गटाचे धनंजय सावंत हे उपाध्यक्षपदी निवडून आले आहेत.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका केल्यामुळेच तानाजी सावंत यांच्याविरोधात सोलापूरातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. “उद्धव साहेब हा खेकडा तर सोलापूर आणि धाराशिवची शिवसेना पोखरत आहे वेळीच नांग्या मोडा”, असा मजकूर बॅनरवर छापण्यात आला आहे. तसेच मजकूराच्या पुढे निष्ठावंत शिवसैनिक असे देखील लिहिण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवस मराठवाड्यातच असल्याकारणाने ते आता यावर काय भूमिका घेतात, याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकूण ५५ जागा आहेत. यापैकी राष्ट्रवादी २६, शिवसेना ११, काँग्रेस १३, भाजप ४ आणि एक अपक्ष सदस्य आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी २८ हा बहुमताचा आकडा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -