नगरपालिका निवडणूक स्थगित इच्छुकांच्या तयारीवर फिरले पाणी

नांदगाव : राजकीय पक्षांसह इच्छुकांनी नगरपालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असतानाच गुरुवारी (दि.१५) राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आले असल्याचे वृत्त नांदगाव शहरात पसरल्याने सर्वांचाच हिरमोड झाला. शिवाय इच्छुक उमेदवारांच्या तयारीवर पाणी फिरले आहे.

राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. 22 जून पासून नांदगाव नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होते. त्या अनुषंगाने नगरपालिका प्रशासनाने तयारीलाही सुरवात केली होती. गुरुवारी (दि.14) निवडणूक आयोगाने प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन तथा विभागीय आयुक्त यांना व जिल्हाधिकारी, नाशिक यांना पत्र पाठवून पत्रात राज्य निवडणूक आयोगाने दि. 8 जुलैच्या पत्रान्वये 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा व 4 नगरपंचायतीच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम दिला होता. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेवर सुनावणी दि. 12 जुलै रोजी झाली. त्यावेळी शासनाने समर्पित आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्ग दिलेला अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला.

सर्वाच्च न्यायालयाने यासंदर्भातील पुढील सुनावणी मंगळवारी (दि. 19) होणार आहे. या पार्श्वभूमीच्या अनुषंगाने नगरपालिका निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात येत असून, सुधारित निवडणुक कार्यक्रम देण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास व सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावण्यास सुरूवातही केली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमच रद्द केल्याने इच्छुक उमेदवारांच्या केलेल्या तयारीवर पाणी फिरल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकित महत्वाचे नऊ निर्णय घेण्यात आले. त्यापैकी एक म्हणजे सरपंच, नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार असल्याचा निर्णय घेतला गेला. एकंदरीत इच्छुकांना आता नवीन निवडणूक कार्यक्रम तारखांची वाट पहावी लागणार आहे.