घरठाणेकल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरून भाजपा-शिंदे गटात जुंपली, भर कार्यक्रमात टोलवाटोलवी

कल्याण-डोंबिवलीतील खड्ड्यांवरून भाजपा-शिंदे गटात जुंपली, भर कार्यक्रमात टोलवाटोलवी

Subscribe

डोंबिवली –  कल्याण डोंबिवलीतील खड्डेमय झालेल्या रस्त्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमात याबाबत टिका टिपण्णी केली जात आहे. डोंबिवलीतील एका कार्यक्रमात एका वक्त्याने खड्डेमय रत्स्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना चिमटा काढला. त्यावेळी डोंबिवलीचे आमदार असलेल्या मंत्री चव्हाण यांनी आपली जबाबदारी झटकून टाकली. तसेच याबाबतचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे टोलवला. मात्र त्यावेळी जे शब्दप्रयोग करण्यात आले, त्यामुळे भाजपा आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडली असून शिंदे गटाकडून चव्हाण यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

दरवर्षीच्या पावसाळ्यात डोंबिवलीतील खड्डेमय झालेले रस्ते म्हणजे जणू काय वर्षानुवर्षाची जुनी परंपराच झाली आहे. मात्र हे चित्र बदलण्यासाठी शहरातील लोकप्रतिनिधी व केडीएमसीचे अधिकारी ठोस अशी काहीच उपाययोजना करीत नाहीत, असाच संतप्त नागरिकांचा एकंदरीत सूर आहे. डोंबिवलीतील विद्यानिकेतन शाळेने तर याबाबत आपल्या शाळेच्या बसवर फलक लावून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्यापाठोपाठ रविवारी डोंबिवलीतील आणखी एका शाळेच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित असताना डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी आता रस्त्यात पडलेल्या खोल खड्ड्यातून प्रतिध्वनी उमटत असल्याचा शाब्दिक चिमटा काढला.

- Advertisement -

हेही वाचा – घोडबंदर रोडवर 200 हून अधिक खड्डे, खराब रस्त्यामुळे रोज दोन तास वाहतूक कोंडी

भर कार्यक्रमात खड्ड्यांबाबत छेडले गेल्याने मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर खुलासेवजा बोलण्याची वेळ आली. त्यावेळी डोंबिवलीतील खड्ड्यांची जबाबदारी माझी नसल्याचे सांगत चव्हाण यांनी हात वर केले. सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत असलेले ९८ किमी लांबीचे रस्ते आहेत. उर्वरित रस्ते हे वेगवेगळ्या खात्यांचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डोंबिवलीतील ज्या खड्ड्यांचा उल्लेख केला गेला, तो खड्डा केडीएमसीशी संबंधित असल्याचे सांगून आपल्या खात्याचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले. फडणवीस सरकारच्या काळात रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीट करण्याच्या कामासाठी ४७१ कोटी निधी मंजूर केला होता. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार येताच तो निर्णय रद्द केला गेला. याबाबत आपण वारंवार बोललो आहे. ज्यांनी कोणी हे पाप केले, त्यांनी पुन्हा हे पाप धुवून संबंधित प्रस्ताव मंजूर करावा, असा टोला लगावत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चेंडू टोलावला. मात्र यातील शब्द प्रयोगामुळे शिंदे गट संतप्त झाला आहे.

- Advertisement -

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आरोपाला शिंदे गटातील माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच मंत्रिमंडळातच रवींद्र चव्हाण हे कॅबिनेट मंत्री आहेत, याचा विसर त्यांना पडला आहे. गेल्या १३ वर्षांपासून डोंबिवलीतील अनेक विकास कामे रवींद्र चव्हाण यांच्यामुळेच रखडलेले आहेत, असा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. तसेच ते ज्या ४७१ कोटींचा उल्लेख करतात ते कधी मंजूर झालेच नव्हते, ते आजही डोंबिवलीकरांची दिशाभूल करीत असल्याचे म्हात्रे यांनी म्हटले आहे. वास्तविक मंत्री रवींद्र चव्हाण हे देखील गुवाहाटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते, त्यावेळी तरी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या कानात सांगायला पाहिजे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत डोंबिवलीतील दोन रस्ते येतात, मात्र ते मंत्री होवून दीड महिना झाला आहे, परंतु अद्यापही त्या दोन रस्त्यांची कामे सुरू झालेली नाही. खरं तर ते आपले पाप लपवण्यासाठी असे आरोप करत आहेत, असा टोला म्हात्रे यांनी चव्हाण यांना लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -