घरमहाराष्ट्रनागपुरातील पावसामुळे राज्यावर वीजसंकट

नागपुरातील पावसामुळे राज्यावर वीजसंकट

Subscribe

चंद्रपुरातील पावसामुळे कोल इंडियाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. डब्ल्यूसीएल, एमसीएल, एसईसीएल या कोल इंडियाच्या उपकंपन्यांनांही नुकसानीचा फटका बसला आहे. या कंपन्यांकडून राज्याच्या ऊर्जा विभागाला मोठ्या प्रमाणावर कोळसा पुरवला जातो.

सावधान! राज्यावर विजेच्या तुटवड्याचे संकट कोसळण्याची दाट शक्यता आहे. विदर्भात गेल्या आठवड्यात प्रचंड पाऊस पडला. त्या पावसामुळे केवळ अधिवेशनाच्या कामकाजाचा खोळंबा केला अशातला भाग नाही, तर महाराष्ट्रात सर्वाधिक कोळसा निर्मिती करणार्‍या खाणींमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे कोळशाचे उत्पादन घटले आहे. त्याचा परिणाम ऊर्जा निर्मितीवर झाला आहे. आगामी १५ दिवस राज्यात विजेची कमतरता जाणवेल. ऊर्जेची ही तूट भरून काढण्यासाठी राज्यात अनेकठिकाणी लोडशेडिंग करावे लागेल, अशी शक्यता ऊर्जा विभागातील जाणकारांनी ‘ आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली आहे.

गेल्या आठवड्यात विदर्भात सर्वत्र मोठा पाऊस झाला. तीन दिवसांच्या या पावसाने विदर्भाची पाण्याची काहीसी गरज भागवली खरी. पण काही ठिकाणी या पावसामुळे मोठे नुकसानही सोसावे लागले आहे. नागपूर शहर तर या पावसाने पाण्याखाली गेल्याची स्थिती होती. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने विधिमंडळाचे अधिवेशनही एक दिवस बंद ठेवावे लागले होते. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे चंद्रपुरातील कोल इंडियाचे झाले आहे. डब्ल्यूसीएल, एमसीएल, एसईसीएल या कोल इंडियाच्या उपकंपन्यांनांही नुकसानीचा फटका बसला आहे. या कंपन्यांकडून राज्याच्या ऊर्जा विभागाला मोठ्या प्रमाणावर कोळसा पुरवला जातो.

- Advertisement -

चंद्रपूरमध्ये कोळशाच्या सर्वाधिक खाणी

पावसाने चंद्रपूरमध्येही कहर केला होता. राज्यातील कोळशाच्या सर्वाधिक खाणी याच जिल्ह्यात आहेत. पावसाचे पाणी यातील काही खाणींमध्ये घुसल्याने खाणीतील कोळसा पाण्यात गेला. या खाणींतून रोज सरासरी एक लाख २१००० मे.टन इतका कोळसा ऊर्जा निर्मितीसाठी पुरवला जातो. पावसाचे पाणी खाणींमध्ये शिरल्याने कोल कंपन्यांना एक लाख मे. टन इतकाच कोळसा चंद्रपूरच्या ऊर्जा संचांना पुरवता आला. २१ हजार मे. टन इतक्या कोळशाच्या तुटीमुळे सुमारे २५० मेगावॅट क्षमतेच्या दोन संचांमधील ऊर्जा निर्मिती कमी होऊ लागला आहे. त्यामुळे राज्यात सुमारे ५०० मेगावॅट इतक्या विजेचा तुटवडा येऊ शकतो. एप्रिल महिन्यात राज्याला २३ हजार मेगावॅट इतक्या विजेची आवश्यकता लागत होती. आज ती २० हजार मेगावॅटपर्यंत खाली आली आहे. ही गरज भागवण्यासाठी काही काळ लोडशेडिंग करण्याची आवश्यकता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्थिती लवकरच सुधारेल

चंद्रपूरमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने खाणींच्या परिसरात गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीहून अधिक पाणी साचलेे. खाणींमध्ये पाणी शिरल्याने कोळशाचा पुरवठा कमी झाला. त्यामुळे ऊर्जा निर्मितीत व्यत्यय येत आहे. मात्र कोल इंडियाबरोबर तातडीने झालेल्या बैठकीनंतर कोळशाचा पुरवठा पूर्ववत करण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.

- Advertisement -

– मदन येरावार, ऊर्जा राज्यमंत्री

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -