मुक्त विद्यापीठात वीज कोसळली; कर्मचारी हादरले

वीज कोसळल्याने कर्मचार्‍यांमध्ये भीतीचे साव

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आवारात दुपारी १ वाजेच्या सुमारास वीज कोसळल्याने कर्मचारी वर्ग अक्षरश: हादरुन गेला. विशेष म्हणजे काही कर्मचार्‍यांसमोर वीज पडली. सुदैवाने कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नाही. विजेचा तडाखा इतका जोरात होता की अनेकांच्या कानठळ्या बसल्या.
या घटनेविषयी एका प्रत्यक्षदर्शी कर्मचार्‍याने सांगितले की, साधारणत: दुपारी १२ वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाट व वीजांचा कडकडाट सुरु झाला. काही कर्मचार्‍यांनी तर आपल्या मोबाईल कॅमेरांत वीजांचा हा ‘तांडव’ कैद केला. दुपारी १ वाजेच्या सुमारास कर्मचारी दुपारचे जेवण करत असताना अचानकपणे जोरदार आवाज विद्यापीठाच्या आवारात झाला. एखादा बॉम्ब फुटल्यागत हा आवाज होता. हा आवाज इतका भयानक होता की, विद्यापीठातील सर्व कर्मचारी कार्यालयातून बाहेर आले. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये क्षणभर भीतीचे सावट पसरले. गंभीर बाब म्हणजे, काही कर्मचार्‍यांच्या अगदी जवळून ही वीज कोसळली. या कर्मचार्‍यांना पुढच्या दहा ते पंधरा मिनिट काहीच सूचेना. त्यांच्या जाणीवा अक्षरश: गोठल्यासारख्या झाल्या. त्यानंतर मळमळणे, डोके दुखणे अशा स्वरुपाचा त्रास या कर्मचार्‍यांना सुरु झाला. पार्किंगच्य शेजारी असलेल्या वीजेच्या खांबावर ही वीज पडली की दुसरीकडे कुठे याचा अद्याप शोध लागलेला नाही. कच्च्या काळजाचा एकादा व्यक्ती असता तर त्याच्या जीवाचे काही बरेवाईट झाले असते, असेच सर्वजण बोलत होते.