प्रकाश आंबेडकरांकडून समीर वानखेडेंची पाठराखण, म्हणाले…

prakash-ambedkar and sameer wankhede

समीर वानखेडे यांच्या आयआरएस नोकरीच्या निमित्ताने वापरण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र, वानखेडेंच्या वडिलांचा धर्म यानिमित्ताने अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी रान उठवले आहे. अनेक कागदपत्रे ट्विटर आणि पत्रकार परिषदांच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्याविरोधात मलिकांनी अनेक कागदपत्रे सादर केली आहेत. पण या सगळ्या वादावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वानखेडेंची पाठराखण केली आहे. अशाच प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत त्यांनी समीर वानखेडेंना जात आणि धर्माबाबत कोणतीही आच येईल असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडेंनी मुस्लिम धर्म स्विकारला. पण समीर वानखेडेंनी आपल्या कुळानुसार असलेल्या जातीचा वापर सुज्ञ झाल्यावर केला आहे. तसेच लग्नदेखील स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार केले आहे. त्यामुळेच जातीचा मुद्दा हा वयात आल्यानंतर स्विकारण्याची समीर वानखेडेंची बाजू योग्य असल्याचे आंबेडकर म्हणाले. वडिलांनी धर्म बदलला म्हणून ही बाब समीर वानखेडेंच्या बाबती लागू पडत नाही. कारण समीर वानखेडे यांनी जन्मजात कुळानुसार मिळालेली जात सुज्ञ झाल्यावर वापरली आहे. त्यामुळेच पालक म्हणून कुळाची जात असली तरीही सुज्ञ झाल्यावर आपल्या मर्जीने या प्रकरणात जाण्याचा अधिकार समीर वानखेडेंना आहे. समीर वानखेडेंना जातीच्या बाबतीत कुळातून बाहेर काढण्यात आले नाही. त्यामुळेच समीर वानखेडेंनी नोकरीसाठी वापरलेल्या जातीच्या प्रमाणपत्राचा मुद्दा योग्य ठरतो. त्यामुळेच कुळाने जन्मतः दिलेला अधिकार म्हणून समाजानेही त्यांना ग्राह्य धरले आहे. अशाच एका प्रकरणात २००५ साली सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या व्यक्तीला कुळातून किंवा जातीतून बाहेर काढलेले नाही.

तुटेपर्यंत ताणू नका

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून दोन आठवड्याहूनही अधिक वेळ संपाचा पवित्रा कायम आहे. याच मुद्द्यावर बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, एसटी कर्मचाऱ्यांचा विलनीकरणाचा मुद्दा योग्य आहे. पण संपाच्या माध्यमातून सुरू असणारे आंदोलन हे तुटेपर्यंत ताणू नका. कारण त्यामुळे संपाचे मूळ उदिष्ट नाहीसे होईल. त्यामुळेच वेळीच संपाचा मुद्दा संपुष्टात आणण्याचे एकप्रकारे संकेत त्यांनी देऊ केले आहेत.