शरद पवार आजही भाजपसोबतच अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आमचा विरोध नाही, असे म्हणत दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटासोबत आघाडी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. शरद पवार आजही भाजपसोबत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी एका वृत्तवाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत केला. सोबतच आमची आघाडी ठाकरे गटासोबत झाली असून महाविकास आघाडीसोबत नाही, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत सामील होण्याआधीच बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केल्यानंतर बर्‍याच नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. यानंतर ३-४ दिवसांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लोक मला का दोष देतात ते समजत नाही. आमच्या पक्षाचे भाजपसोबत जाण्याचे आधीच ठरले होते. फक्त मी पहिला गेलो. २०१९ च्या लोकसभेआधीच आमचे ठरले होते, असे अजित पवारांनी सांगितल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी निदर्शनास आणले. भाजपविरोधी पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयोग के. सी. आर यांनी केला होता, परंतु त्यात शरद पवार नव्हते. शिवसेनेला भाजपसोबतच्या युतीतून बाहेर पडायचे होते. कारण शिवसेनेला सत्तेची गरज नव्हती. गरज होती ती राष्ट्रवादी आणि काँग्रेसला. शिवसेनेने सत्ता आपल्या हाती ठेवली असती तर सरकार पडले नसते, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तुम्ही महाविकास आघाडीत सामील होणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर देताना ते आताच सांगता येणार नाही. कारण आम्हाला महाविकास आघाडीत घेऊन जायचे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आमच्यासोबत आणायचे याबाबतचे वकीलपत्र आम्ही उद्धव ठाकरे यांना दिले आहे. त्यामुळे तेच काय ते आता ठरवतील, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.