Lockdown : प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘उद्धव ठाकरे, खुदा बनू नका!’

prakash ambedkar

एकीकडे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे कोरोनावरची लस इतक्यात बाजारात येईल अशी कोणतीही शक्यता नाही. WHOनेच सांगितल्याप्रमाणे २०२१पूर्वी कोरोनाची लस येणार नाही. त्यामुळे राज्यात सध्या लागू असलेल्या लॉकडाऊनचं काय करायचं? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहाता राज्यातला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन न वाढवण्याची मागणी केली आहे. ‘उद्धव ठाकरे, तुम्ही खुदा होऊ नका. लॉकडाऊन (Lockdown) वाढवू नका, नाहीतर लोकं उपासमारीने मरतील’, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ देखील जाहीर केला असून त्यामध्ये त्यांनी राज्यातल्या कोरोना रुग्णवाढीची परिस्थिती आणि त्यानुसार लॉकडाऊन उठवण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्ही खुदा बनू नका. सुरुवातीला भारतात ४० टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील असे अमेरिकेच्या हाफकीन संस्थेने सांगितले होते. त्यामुळे मीही घाबरलो होतो. पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे’, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

उद्धव ठाकरेंना विनंती आहे की…!

प्रकाश आंबेडकरांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे ही मागणी! #MyMahanagar Balasaheb Ambedkar

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Sunday, July 26, 2020

‘ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही, ते कोरोनाने (Corona) नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन वाढवू नका’, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

‘बुद्धाने एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे, त्यामुळे शासनाला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे तरच माणसं जगतील अन्यथा उपासमारीने मरतील’, असंही ते म्हणाले.