काँग्रेस हरत असलेल्या जागाही द्यायला तयार नव्हती – प्रकाश आंबेडकर

vanchit bahujan aghadi factor congress ncp lost 27 seats in akola district
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करणाऱ्या प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेससोबतच्या चर्चेमध्ये आडमुठी भूमिका घेतल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, त्याला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे. ‘ज्या जागा काँग्रेसकडून तीन तीन वेळा हरल्या होत्या, त्या जागा मागूनही त्यांनी दिल्या नाहीत, याचा अर्थ एकच होता की त्यांना आम्हाला येऊ द्यायचं नव्हतं’, असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. त्याशिवाय, ‘अशोक चव्हाण देखील बैठकीला होते. त्यांना मी विचारलं की दिल्लीहून तुम्हाला काही मॅन्डेट दिलं आहे का माझ्याशी बोलणी करण्यासाठी, तर त्यावर मला काहीही उत्तर मिळालं नाही’, असा खुलासा देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला.

‘समाजात नको त्या गोष्टींना महत्त्व’

दरम्यान, ‘समाजाने नको त्या गोष्टींना फार महत्त्व दिलं’, असं यावेळी आंबेडकरांनी नमूद केलं. ‘आज धार्मिक दृष्ट्या देश हिंदुंचा झाला पाहिजे यावर आपण सगळी ऊर्जा खर्च करतोय. शिवाय, फाळणीचं भूत उभं करून मुस्लिमांचं स्तोम माजवलं आहे की त्यांना नियंत्रणात ठेवायला हवं. त्यासोबतच इतरांना स्वीकारच करायचा नाही, या विचारामुळे नुकसान होतंय. या गोष्टी देशाला मारक आहेत. आम्ही एकत्र राहणार, ही संकल्पना आपण बाळगणार आहोत की इतरांवर सत्ता गाजवून त्यांना दुय्य्म नागरिक करणार आहोत? यातून आपण बाहेर पडणार का?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

फक्त मुस्लिमांमध्येच असुरक्षिततेची भावना?

दरम्यान, देशात फक्त मुस्लिमांमध्येच असुरक्षिततेची भावना नसल्याचं यावेळी ते म्हणाले. ‘असुरक्षिततेची भावना फक्त मुस्लिमांमध्येच आहे असं का वाटतं? आदिवासी तुमच्यासोबत आहेत असं तुम्हाला का वाटतं? त्यांच्या विद्रोहाचा एल्गार होणार नाही, त्यांच्या असंतोषाचा कुणी फायदा घेणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी’, असं त्यांनी नमूद केलं.