घरलोकसभा २०१९खडाजंगीसोलापुरात त्रांगडं होणार; प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी जाहीर!

सोलापुरात त्रांगडं होणार; प्रकाश आंबेडकरांची उमेदवारी जाहीर!

Subscribe

सोलापूर लोकसभा मतदारसंघातल्या लढतीचं चित्र आता स्पष्ट झालं असून प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून तिथून निवडणूक लढणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आपल्या उमेदवारीविषयी राखून ठेवलेला सस्पेन्स अखेर प्रकाश आंबेडकर यांनी संपवला असून सोलापुरातून आपली उमेदवारी त्यांनी जाहीर केली आहे. २५ मार्च, सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर प्रकाश आंबेडकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. लातूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला. याआधीही त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी ते सोलापुरातून निवडणूक लढणार असल्याचं रीतसर पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. शिवाय प्रकाश आंबेडकरांनी देखील स्वत: सोलापूरचा शोलापूर करू म्हणत दंड थोपटले होते. अखेर रविवारी त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.

काय गणित आहे सोलापूरचं?

सोलापूरमध्ये साधारणपणे १९ ते २० लाखांच्या आसपास मतदार आहेत. यामध्ये लिंगायत, मुस्लीम आणि दलित समाजाची मतं मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळेच हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव करण्यात आला आहे. भाजपने यावेळी स्थानिक जातीय गणितं लक्षात घेत त्यानुसार उमेदवार दिले आहेत. म्हणूनच विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचा पत्ता कट करत लिंगायत समाजाचे सोलापूरमधील गुरू जयसिद्धेश्वर स्वामी यांना भाजपने तिकीट दिलं आहे. त्यामुळे लिंगायत समाजाची एकगठ्ठा मतं भाजपकडे वळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सुशीलकुमार शिंदेंच्या रुपाने या जागेसाठी तगडा दावा काँग्रेसनं ठोकला आहे. शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या सोलापुरात मोदी लाटेवर स्वार होत शरद बनसोडेंनी २०१४मध्ये सुमारे २ लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ते भाजपची बी टीम’, अजित पवारांची प्रकाश आंबेडकरांवर टीका

शिंदेंसमोर मोठं आव्हान

मोदी लाट ओसरली असताना सुशीलकुमार शिंदेंनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला ताब्यात घ्यायची तयारी सुरू केली होती. मात्र, अशातच प्रकाश आंबेडकरांनी आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामींपेक्षा शिंदेंचं काम अवघड होऊन बसणार आहे. कारण मतदारसंघातल्या दलित आणि मुस्लीम मतदारांसमोर शिंदेंसोबतच आता आंबेडकरांचा देखील पर्याय असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत खऱ्या अर्थानं कंबर कसून कामाला लागावं लागणार आहे.

आंबेडकरांची उमेदवारी भाजपच्या पथ्थ्यावर?

दरम्यान, अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या परंपरागत मतदार वर्गालाच हात घालणार असल्यामुळे त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच होणार आहे. विशेषत: जयसिद्धेश्वर स्वामींच्या रुपाने लिंगायत समाजाची एकगठ्ठा मतं एकीकडे भाजपच्या वाट्याला येणार असतानाच दलित मतं प्रकाश आंबेडकरांच्या ताब्यात जाऊ शकतात. मात्र, शिंदेंच्या ढोर समाजाची लोकसंख्या प्रभाव पाडता न येण्याइतकी असल्यामुळे त्यांना आंबेडकरांच्या एंट्रीने चांगलाच फटका बसू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -