प्रकाश आंबेडकरांचा राऊतांवर पलटवार; म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर…

Prakash Ambedkar Reaction On Sanjay Raut | एकीकडे महाविकास आघाडीत सहभागी होण्याचं स्वप्न पाहत असताना प्रकाश आंबेडकर शरद पवारांवरच टीका करत आहेत.

prakash ambedkar and sanjay raut

Prakash Ambedkar Reaction On Sanjay Raut | लातूर- शिवसेना आणि महाविकास आघाडीचा भाग व्हायचे असेल तर प्रमुख स्तंभांवर बोलू नये, असा सज्जड दम शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांना दिला होता. यावरून आता प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे. ते म्हणाले की हा सल्ला मला उद्धव ठाकरेंनी दिला तर मी मानेन. यावरूनच प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत युती केली असली तरीही त्यांचा राऊतांवर निशाणा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा – ‘मविआ’चा भाग व्हायचे असेल तर, प्रमुख स्तंभांवर बोलू नये; राऊतांचा आंबेडकरांना सल्ला

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्यात युती झाली आहे. मात्र, वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग नसेल. परंतु, उद्धव ठाकरेंचे त्यादिशेने प्रयत्न सुरू असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं. असं असतानाच त्यांनी शरद पवारांवरच टीकास्त्र डागलं होतं. शरद पवार आजही भाजपाचेच आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं. यावरून राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली.

एकीकडे महाविकास आघाडीत सहभागी होण्याचं स्वप्न पाहत असताना प्रकाश आंबेडकर शरद पवारांवरच टीका करत आहेत. “महाविकास आघाडीचा भाग व्हायचे असेल तर, प्रमुख स्तंभांवर बोलू नये. शरद पवार हे देशातल्या भाजपविरोधातल्या आघाडीच्या प्रयत्नातले प्रमुख स्तंभ आहेत. तसेच, प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेची युती झाली असून, ते लवकरच महाविकास आघाडीचे घटक होतील. त्यामुळे त्यांनी प्रमुख स्तंभांवर बोलू नये” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला होता. याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले. परंतु, हा सल्ला मला उद्धव ठाकरेंनी दिला असता तर मी याबाबत विचार केला असता असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा – प्रकाश आंबेडकर भाजपासोबतही राजकीय समझौता करायला तयार, पण घातली ‘ही’ अट

इतिहासातील काही घटनांवरून मी शरद पवारांवर विधान केलं होतं. त्याचा आताच्या परिस्थितीशी काहीही संबंध नाही. कोणी त्याला चुकीच्या पद्धतीने घेत असेल तर त्याला मी काहीही करू शकत नाही”, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं.

भाजपाला कमी लेखू नका

“भाजपाला तुम्ही कमी लेखू नका. भाजपा कोणत्याही परिस्थिती कोणत्याही स्थराला जाऊ शकते. भांडण लावणे, मतभेद निर्माण करणे हा त्यांचा फंडा आहे. जेव्हा आपण निवडणूक जिंकत नाही, असं भाजपाला वाटतं तेव्हा ते भांडणं लावण्याचं काम करतात, अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली. त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल, हुकुमशाही नको असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवं, असंही आंबेडकर म्हणाले.