धाराशिव : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मीक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मीक कराड हा अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र अद्यापही धनंजय मुंडे यांचा राजीनामा होताना दिसत नाही. अशातच भगवान गडाच्या महंतांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिला आहे. धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत, त्यांची मीडिया ट्रायल केली जात आहे. त्यामुळे या संकटात भगवान गड धनंजय मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे वक्तव्य महंत नामदेव शास्त्री महाराजांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत असतानाच मनसे नेते प्रकाश महाजन यांनी धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री महाराज यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. (Prakash Mahajan criticizes Namdev Shastri after he supports Dhananjay Munde)
धाराशिवमध्ये आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश महाजन यांनी म्हटले की, धनंजय मुंडे यांना मीडियाच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. पण मीडिया ट्रायल का केली जात आहे, याचा विचार धनंजय मुंडेंनी करायला हवा. बीड जिल्हा परिषदेत सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना त्रास दिला होता, पण आज ते दोघे भांडत आहेत. तर दुसरीकडे स्वतः ला न्यायाचार्य म्हणवणाऱ्या नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेना गरज होती तेव्हा गडाचे दरवाजे बंद केले होते. पण आता नामदेव शास्त्रींनी न्याय देताना स्त्री-पुरुष असा भेद केला आहे. महाराजांनी आपली प्रतिज्ञा मोडून एक राजकीय भूमिका घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आता संकटात आहेत, असे त्यांना वाटत नाही. मीडियातून तसा भास निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे, असा हल्लाबोल प्रकाश महाजन यांनी केला.
हेही वाचा – Namdev Shastri : मस्साजोगमधील आरोपींची मानसिकाताही समजून घेतली पाहिजे – नामदेव शास्त्री
भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर रात्री भगवान गडावर मुक्काम केला होता. यावेळी त्यांनी नामदेव शास्त्री महाराज यांच्याशी चर्चा केली. यानंतर आज सकाळी नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे जाहीर केले. त्यांनी म्हटले की, धनंजय मुंडे हे राजकीय घराण्यात जन्माला आले आहेत. विविध पक्षाचे नेते त्यांचे बालमित्र आहेत. ते गुन्हेगार नाहीत. परंतु त्यांना गुन्हेगार का ठरवत आहेत, हे समजत नाही. पण भगवान गड हा भक्कमपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. धनंजय मुंडे हे खंडणीवर जगणारे नाहीत, तरीही गेल्या 53 दिवसांपासून त्यांची मीडिया ट्रायल सुरू आहे, असे नामदेव शास्त्री यांनी म्हटले.