घरमहाराष्ट्रAjit Pawar : मविआमध्ये असताना प्रकाश सोळंके देणार होते राजीनामा, अजित पवारांनी...

Ajit Pawar : मविआमध्ये असताना प्रकाश सोळंके देणार होते राजीनामा, अजित पवारांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Subscribe

रायगड : कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर पार पडत आहे. या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाष्य करत उपस्थित पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि पक्षातील सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना सूचना केल्या. काल शिबिराच्या पहिल्या दिवशी अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादीतील बंडाविषयी अप्रत्यक्षपणे वक्तव्य केले. आज अजित पवारांनी मार्गदर्शन करताना शरद पवार यांच्या नावाचा कुठेही उल्लेख न करता बऱ्याच गोष्टींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी 2019 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीने म्हणजेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केली, त्यावेळी प्रकाश सोळंके हे नेमके का राजीनामा देणार होते, याबाबतचा किस्सा सांगितला. तर जयंत पाटील यांनी त्यावेळी दिलेला शब्द कसा पाळला नाही, याचाही गौप्यस्फोट केला आहे. (Prakash Solanke was going to resign while in MVA, Ajit Pawar told ‘that’ story)

हेही वाचा – Breaking : लोकसभेच्या ‘या’ जागा अजित पवार गट लढवणारच; कर्जत शिबिरातून अजित पवारांची घोषणा

- Advertisement -

कर्जत येथील मंथन शिबिरात अजित पवार म्हणाले की, मी जे बोलतो ना, त्यातले एक अक्षर चुकीचे आणि खोटे बोलणार नाही. प्रकाश सोळंके समोर बसले आहेत त्यांना माहीत आहे की नेमके काय आहे ते. 2019मध्ये प्रकाश सोळंके नाराज झालेले होते. अशोक डक, मी स्वतः, प्रकाश सोळंके आणि जतंय पाटील काही वेळेस धनंजय मुंडे, अशा आमच्या बैठका होत होत्या. प्रकाश साळुंके नाराज होते. त्यावेळी ते राजीनामा देण्याच्या तयारीत होते. बातम्या काढून बघा. आम्ही म्हटले अहो आत्ताच सरकार आले आहे, एवढी टोकाची भूमिका तुम्ही घेऊ नका. त्यांचे म्हणणे होते की मी काय पक्षासाठी कमी केले आहे का. गेल्या टर्ममध्येही तुम्ही मला मध्येच सहा महिने की वर्षभर असे आधीच काढून टाकले. कारण काय? पक्षाने अशी भूमिका माझ्याबाबत का घेतली? आता पक्ष सत्तेत आला आहे. मंत्रीपदं मिळत आहेत, तर मलाही मिळाले पाहिजे. रास्त मागणी त्यांची होती. शेवटी मी, प्रकाश सोळंके आणि जयंत पाटील तिथल्या एक चेंबरमध्ये गेलो. त्यांना समजावले. असे करु नका. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीच्या वैळी मिठाचा खडा लागणे बरोबर नाही. वैगरे वैगरे वैगरे वैगरे…

त्यानंतर, मग मी आणि जयंत पाटलांनी प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्ष पदाचा शब्द दिला आणि जयंत पाटलांनी काय सांगितले आपल्याला? एक वर्ष मी अध्यक्ष राहतो. एक वर्षांनी तुम्ही कार्याध्यक्षाचे अध्यक्ष व्हा. संघटनेची जबाबदारी तुम्ही पार पाडा. हे प्रकाश सोळंकेंनी ऐकले. तेव्हा ते म्हणाले, असे होत असेल तर ठिक आहे. पण फक्त मला जबाबदारी द्या, मला काम करायचे आहे. एक वर्ष झाले मी म्हटले जयंतराव आपण शब्द दिला आहे. जयंत पाटील म्हणाले, हो शब्द दिला आहे, पण वरिष्ठ म्हणत आहेत की, थांब तूच राहा. मी म्हटले तुम्ही वरिष्ठांना सांगा ना, नको मला बास झाले. मला मंत्रिपद आहे, तिथेच वेळ देता येत नाही. त्यावेळी त्यांच्यावर जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी होती. जलसंपदा खाते काही साधेसुधे खाते नाही. पण, ते असेच पुढे ढकलत ढकलत सुरूच होते. हे बरोबर नाही. माझे म्हणणे आहे की, एकदा तुम्ही शब्द दिला ना की, एखादा महिना पुढे मागे ठिक आहे. शब्द देताना दहा वेळा विचार करुन शब्द द्या ना. पण यापद्धतीने कार्यकर्त्यांना नाराज करायचे. हे मला अजिबात आवडत नाही. कोणाला नाराज करू नका, संघटनेसाठी केलेल्या या बारिक बारिक गोष्टी साठत राहतात आणि मग त्यांचा अशा पद्धतीने उद्रेक होतो, असा गौप्यस्फोट अजित पवारांकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -