‘एमपीएससी’ परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात अव्वल

एमपीएससीने जाहीर केलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही तात्पुरत्या स्वरूपाची असून या यादीतील उमेदवारांना ३ ते १० मार्च या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवणे अनिर्वाय आहे. त्यांनी नोंदवलेल्या पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ (एमपीएससी) या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली असून या परीक्षेत सांगलीचा प्रमोद बाळासाहेब चौगुले राज्यात पुन्हा एकदा अव्वल आला आहे. त्याला या परीक्षेत ६३३.७५ गुण मिळाले आहेत. प्रमोद चौगुले याने गेल्या वर्षीच्या मुख्य परीक्षेतही पहिला क्रमांक मिळवला होता; मात्र अपेक्षित पोस्ट उपलब्ध नसल्याने त्याने पुन्हा परीक्षा दिली.

प्रमोद चौगुले याच्याव्यतिरिक्त खुल्या गटात शुभम पाटील याने ६१६ गुण, तर महिला गटात सोनाली मात्रे हिने ६०१.७५ गुण मिळवून पहिला क्रमांक मिळवला आहे. ‘एमपीएससी’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. एमपीएससीची परीक्षा ४०५ पदांसाठी घेण्यात आली होती. पात्र उमेदवारांच्या मुलाखती २७ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या. मंगळवारी (२८ फेब्रुवारीला) मुलाखती संपल्यानंतर, ‘एमपीएससी’ने दोन तासांच्या आत उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आपल्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली.

एमपीएससीने जाहीर केलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी ही तात्पुरत्या स्वरूपाची असून या यादीतील उमेदवारांना ३ ते १० मार्च या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवणे अनिर्वाय आहे. त्यांनी नोंदवलेल्या पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल. अर्जातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने कागदपत्रे पडताळणी करताना उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो आणि उमेदवार पात्र ठरू शकतो.

खडतर परिस्थितीवर प्रमोदची मात
प्रमोद चौगुले शेतकरी कुटुंबातील असून त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. याशिवाय वडिलांनी अनेक दिवस टेम्पोचालक म्हणून काम केले आहे. अशा खडतर परिस्थितीतही इंजिनीअर होऊन, राज्य सेवा परीक्षेच्या निकालात राज्यात पहिला येण्याचा मान मिरज तालुक्याच्या सोनी गावातील प्रमोद चौगुले याने सलग दुसऱ्यांदा मिळविला आहे. आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही आई-वडिलांनी प्रमोदला दिलेल्या पाठबळामुळे प्रमोदने हे घवघवीत यश मिळवले.

अभ्यासात सातत्याची गरज
महाराष्ट्र लोकसेवा आयोगासारख्या परीक्षेत यश मिळवायचे असेल, तर सातत्य राखण्याची गरज आहे. केवळ परीक्षेत यश मिळविणे हेच ध्येय असले पाहिजे. यावेळी मला अपेक्षित पद मिळेल, अशी आशा आहे. म्हणूनच मी तूर्तास परीक्षेची तयारी थांबवत आहे, असे उद्योग विभागात उपसंचालक (प्रोबेशनरी ऑफिसर) असलेल्या प्रमोद चौगुले याने सांगितले.