प्रणिती शिंदे नवनीत राणांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवणार?

Praniti Shinde will contest Lok Sabha elections against Navneet Rana in Amravati
प्रणिती शिंदे अमरावतीत नवनीत राणांच्या विरुद्ध लोकसभा निवडणूक लढवणार?

काँग्रेसचे शिर्डीमध्ये चिंतन शिबिर सुरू आहे. या शिबिरात सादर करण्यात आलेल्या एका पत्रामुळे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची राजकीय कोंडी करण्याच्या दिशेने पाऊले टाकली जात आहेत का ?, अशी चर्चा सुरू झाली आहे. खासदार नवनीत राणा यांनी भोंगा आणि हनुमान चालीसा मुद्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे.

आमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या विरुद्ध 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आमदार प्रणिती शिंदेंना (Praniti Shinde) अमरावतीमधून लोकसेभेची उमेदवारी (Lok Sabha elections) द्यावी, असे पत्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी दिले. या पत्रावर पक्षश्रेष्ठी काय विर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2019 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने निवडणूक लढवली आणि जिंकून आल्या होत्या. पण, आता नवनीत राणा भाजपच्या जवळ गेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून एक वेगळेच वळण जिल्ह्याला देण्याचे काम केलेले आहे.

यामुळे मतदारसंघातल्या लोकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये पुर्ण बहुजन समाज एकवटला आहे, या संधीचा फायदा घेऊन अमरावती लोकसभा निवडणुकीची आतापासून तयारी केल्यास अभ्यासू, सुशिक्षित आणि जनतेशी नाळ असणाऱ्या आमदार प्रणिती शिंदे उत्तम पर्याय ठरू शकतात, असे पत्रात म्हटले आहे