‘मलिकांच्या जावयाला अटक झाली होती मग त्यासाठी राष्ट्रवादीला जबाबदार धरायचे का?’ दरेकारांचा सवाल

पोलिसांकडून महिती मिळवून केवळ तीर मारण्याचे काम

Praveen Darekar Slams Nawab Malik on allegations against NCB
'मलिकांच्या जावयाला अटक झाली होती मग त्यासाठी राष्ट्रवादीला जबाबदार धरायचे का?' दरेकारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीवर गंभीर आरोप करत काही सवाल उपस्थित केले. नवाब मलिक यांच्या प्रश्नांवर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपवर दोषारोप करत असताना भाजप नेत्याच्या मेहुण्यावर आरोप करण्यात आले आहेत मात्र ते अद्याप सिद्ध व्हायचे आहेत. परंतु नवाब मलिक यांच्या जावयांना थेट एनसीबीने अटक केली होती. मग याचा दोष थेट सासरे नवाब मलिक यांना द्यायचा का? त्याना दोषी धरायचे का?,असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

मोहीत कंभोजच्या नावाखाली भाजपला जबाबदार धरण्याचा प्रयत्न करत आहात मग आम्ही नवाब मलिक यांच्या जावयाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरायचे का? याचे उत्तर देखील नवाब मलिक यांने द्यावे, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले.

पोलिसांकडून महिती मिळवून केवळ तीर मारण्याचे काम

कायदा हा सर्वांना समान असतो.मात्र मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस तुमच्या ताब्यात आहेत त्यामुळे कॉल रेकॉर्ड तपासणे तुमच्यासाठी सोपे आहे. त्यामुळे NCB कडे माहिती देणेही सोपे झाले. पोलिसांकडून महिती मिळवून केवळ तीर मारण्याचे काम नवाब मलिक यांनी केले आहे.

कोणालातरी वाचवण्यासाठी सनसनाटी निर्माण करण्याचा मलिकांचा प्रयत्न

तरुण पिढी आमली पदार्थाच्या आहारी जात असल्याने त्यावर वचक बसवण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करणे महत्त्वाचे आहे मात्र मूळ विषय बाजूला ठेवून कोणालातरी वाचवण्यासाठी सनसनाटी निर्माण करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास नाही तर आमचा जनतेच्या न्यायालयावर विश्वास आहे. न्यायलयावर विश्वास नाही असे म्हणायचे आणि रोज सनसनाटी आरोप करायचे आणि संबंधितांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिकांची असल्याचे दिसून येत आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली.

कायदा आणि संस्थांपेक्षा नवाब मलिक ज्ञानी

नवाब मलिकांनी दाखवलेल्या गोष्टी खरी आहेत हे मानण्याची घाई करू नये. जे सत्य आहे ते जनतेसमोर येईलच आणि फर्जिवाडा कोणाचा आहे हे सर्वांना कळेलच. आपल्याकडे सर्वोत्तम क्षमतावान आणि विश्वासार्ह संस्था आहेत. त्यांच्यापेक्षा नवाब मलिक यांना जास्त ज्ञान आणि कायद्याचे आकलन असेल तर ते कायदा आणि संस्थांपेक्षा ज्ञानी आहेत,असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला.

मलिकांचे वक्तव्य म्हणजे आरोपांची सिद्धता नाही

नवाब मलिकांच्या गंभीर आरोपांची दखल एनसीबी नक्कीच घेत असेल.एखादा जबाबदार मंत्री त्यावेळी त्यांची दखल संबंधित एजन्सी घेईल आणि त्यासंबंधीची माहिती घेऊन खरे खोटे जनतेसमोर येईल, असे प्रवीण दरेकर म्हणाले. नवाब मलिक यांनी केवळ आरोप केले आहे. त्यांचे वक्तव्य म्हणजे आरोपांची सिद्धता नाही. त्या आरोपांची तपासणी यंत्रणा करतील. नवाब मलिक यांच्या ताब्यात यंत्रणा आहेत त्यामुळे ते त्यांच्या शंकांचे निराकरण करू शकतात.


हेही वाचा – Cruise Drug bust : नवाब मलिकांचा ‘त्या’ भाजप नेत्याच्या मेहुण्याबाबतचा गौप्यस्फोट