घरताज्या घडामोडीप्रवीण परदेशी परतले राज्यात, पदभार सांभाळणार केंद्रात

प्रवीण परदेशी परतले राज्यात, पदभार सांभाळणार केंद्रात

Subscribe

मुंबई महापालिकेचे आयुक्त राहिलेले प्रवीण परदेशी यांची वर्णी राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी ठाकरे सरकारने लावली आहे. राज्यातील एकुण ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर महाविकास आघाडी सरकारमार्फत बुधवारी जाहीर करण्यात आली. प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिका आयुक्त पदावरून मे २०२० मध्ये बदली केल्यानंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नगर विकास खाते आणि जलसंधारण विभागाचा कार्यभार सांभाळला होता. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या एका प्रकल्पाच्या निमित्ताने परदेशात जाणे पसंत केले होते. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारच्या नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती केंद्र सरकारने केली होती. मात्र अचानक आज बुधवारी महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा त्यांना राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून पाठवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज्यातला पदभाराची औपचारिकता बुधवारी स्विकारल्यानंतर ते दिल्लीतल्या मोदी सरकारच्या नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनच्या सदस्य पदाचा पदभार सांभाळणार असल्याचे कळते. दरम्यान आपल महानगरशी बोलताना परदेशी यांनी राज्याच्या सेवेतून मी संयुक्त राष्ट्राच्या सेवेत गेलो असल्याने पहिल्यांदा मला राज्य सरकारमध्ये नियुक्ती पत्र घ्यावे लागले. त्यानुसार सरकारने माझी मराठी भाषा विभागात नुसारच मी दिल्लीत नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनचा पदभार सांभाळेन असे सांगितले.

या ११ महिन्यांच्या कालावधीनंतर परदेशी यांचा संयुक्त राष्ट्रातील पदाच्या जबाबादारीचा कार्यकाळ हा २१ जूनला संपला आहे. त्यामुळेच राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे नव्या आदेशान्वये देण्यात आली आहे. प्रवीण सिंह परदेशी हे केंद्राच्या नॅशनल कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशनच्या पदाची जबाबदारी येत्या दोन दिवसात स्विकारतील. ही जबाबदारी २ वर्षांची असणार आहे. या जबाबदारी अंतर्गत अधिकारी वर्गाचे प्रशिक्षण, कामगिरीचे मूल्यमापन, क्षमतेवर आधारीत कामगिरीचे मूल्यमापन यासारख्या जबाबदाऱ्यांचा समावेश आहे. प्रवीण परदेशी हे १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात ते सेवा निवृत्त होणार आहेत.

- Advertisement -

कशी आहे बदल्यांची ऑर्डर ?

राज्यात एकुण ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर सामान्य प्रशासन विभागामार्फत जाहीर करण्यात आली. या बदल्यांमध्ये माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक रणजित कुमार यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात सह सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. रणजित कुमार हे २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. व्ही पी फड हे २०११ च्या बॅचचे अधिकारी आहे. त्यांची बदली ही उस्मानाबाद जिल्हा परिषद सीईओ पदावरून आता मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ, औरंगाबाद या पदी करण्यात आली आहे. डॉ पंकज आशिया यांच्याकडे भिवंडी – निजामपुर महापालिकेचे आयुक्त म्हणून जबाबदारी होती, त्यांना जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर जबाबदारी देण्यात आली आहे. राहुल गुप्ता यांच्याकडे गडचिरोली येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, अहेरी, गडचिरोली अशी जबाबदारी होती. त्यांना उस्मानाबाद जिल्हापरिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मंजुल जिंदाल यांच्याकडे सहाय्यक जिल्हाधिकारी, भामरागड, गडचिरोली अशी जबाबदारी होती. त्यांची बदली जालना जिल्हा परिषदेवर सीईओ म्हणून करण्यात आली आहे. मिताली सेठी यांच्याकडे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून अमरावती येथे जबाबदारी होती. त्यांना चंद्रपूर जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -