Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी खरे दरोडेखोर कोण हे मुंबईकरांना चांगलंच माहितीये, दरेकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

खरे दरोडेखोर कोण हे मुंबईकरांना चांगलंच माहितीये, दरेकरांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबईतील सिमेंट-कॉंक्रिटच्या रस्ते कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे यांच्या या आरोपांना भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार होती. मुंबईला लुटून खरे दरोडे कुणी टाकले हे मुंबईकरांना नीट माहित आहे, असा घणाघात दरेकर यांनी केला. तसेच शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासाची गती होतेय त्याने उद्धव ठाकरे भयभीत आणि आदित्य ठाकरे भांबावलेल्या अवस्थेत आहेत, असेही दरेकर म्हणाले.

प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कंत्राट, कंत्राटदारांशी संबंध आणि टक्केवारीचा उत्तम अभ्यास आदित्य ठाकरे यांचा दिसला. कारण इतकी वर्ष महापालिकेत कंत्राटदार कोण होते? त्यांचे संबंध कुणाशी होते, टक्केवारीचे गणित काय होते हे त्यांनी आज नीट मांडले. खरे म्हणजे कामाचा दर्जा राखला जात नव्हता. परंतु ह्यांना मुंबईकरांच्या कामाच्या दर्जा संबंधी काही देणेघेणे नव्हते तर टक्केवारीचे कॅलक्यूलेशन महत्वाचे होते, असा टोलाही दरेकरांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, एका बाजूला सांगताहेत नॅशनल कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत. मग आपल्या पोटात का दुखते. उत्तम कंपन्या आणून वेळेत काम होणार असेल तर आपण क्षमतेवर शंका कशाला घेता. सहा वर्षाचे काम तीन वर्षाचे कंत्राट देऊन पुढे जाणार असेल तर ह्यात गैरव्यवहार, भ्रष्टाचार कुठे आला. पूर्णपणे मुंबईचा कायापालट होतोय, ज्या गतीने शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विकासाची गती होतेय त्याने उद्धव ठाकरे भयभीत आणि आदित्य ठाकरे भांबावलेल्या अवस्थेत आहेत. खोके सरकार, खोके सरकार या पलीकडे त्यांची रिळ पुढे जायला तयार नाही. आज प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर, अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एवढी वर्ष आयुक्त चहलच होते ना? मातोश्रीवर फेऱ्या मारत होते तेव्हा त्यांचे उत्तम आयुक्त म्हणून वर्णन केले. सरकार बदलल्यावर त्यांच्या अधिकारांवर प्रश्न उभे करता. यावरून मुंबईवरील पुतना मावशीचे प्रेम आणि राजकारण मुंबईकरांना दिसून येतेय, असा घणाघातही दरेकरांनी यावेळी केला.

विरोधी पक्ष म्हणून तुमच्यात धमक, क्षमता, मुद्दे नाही. ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुका झाल्या सगळ्या निवडणुकीत जनतेने धोबीपछाड केला. चौथ्या क्रमांकावर गेलात. भाजपा पहिल्या क्रमांकावर आणि नव्या पक्षाला बाळासाहेबांच्या शिवसेनेला आपल्यापेक्षा यश मिळाले. त्यामुळे जनता कुणाच्या बाजूने आहे हे दिसून येते. त्यामुळे आजची आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार ठरली.

- Advertisement -

सहा महिने झाले पाच हजार कोटीच्या टेंडरनी एवढे अत्यवस्थ का होताय असा सवाल करत दरेकर पुढे म्हणाले की, २५ वर्षाच्या टेंडरची रक्कम काढा, कंत्राटदारांची यादी जाहीर करा. मग आदित्यजी मुंबईला लूटमार नाही तर दरोडेखोर कोण, दरोडे कुणी टाकले मुंबईकरांना नीट माहित आहे. त्यामुळे पोकळ आव आणण्याचा प्रयत्न करू नका. मुंबईकर सुज्ञ आहे. मुंबईकर सब कुछ जानता है, असंही दरेकर म्हणाले.


हेही वाचा : रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावरून आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर शिंदे सरकार


 

- Advertisment -