मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा – प्रवीण दरेकर

pravin darekar
विनाअनुदानित शाळेतील ५० हजार शिक्षकांना तात्काळ मदत द्या, दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील विरोध पक्ष भाज मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाला आहे. ओबीसी आरक्षणासाठी २६ जूनला भाजपने ठिकठिकाणी आंदोलनं केली. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटकारलं. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उत्तर देताना मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा, असा सल्ला दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी मुंबईत शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं.

मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत वेळकाढूपणाचं राजकारण करत आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन मुख्यमंत्र्यांना आदळआपट वाटतं. मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा. आताचा संघर्ष ही तर केवळ ठिणगी आहे, त्याचं वणव्यात कधी रुपांतर होईल, ते कळणारही नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी येत्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा विषय निकाली काढावा, असा इशाराच प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारला आरक्षण टिकवता आलं नाही

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढून ते आरक्षण न्यायालयात टिकवलं. मराठा आरक्षणाचा कायदा करुन तो ही त्यांनी उच्च न्यायालयात टिकवला. मात्र, महाविकास आघाडी सरकारला सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवता आलं नाही, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली.