नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी बचाव साहित्य उपलब्ध करून द्यावे, प्रविण दरेकरांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

pravin darekar

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. तेथे जाऊन प्रत्यक्ष तेथील परिस्थितीची आढावा घेतल्यानंतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी आवश्यक असलेले शोध व बचाव साहित्य उपलब्ध होण्याची आवश्यकता असून भाजपचे नेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना यांसदर्भात आज निवेदन दिले आहे. तसेच आपत्तीच्या काळात त्या भागांमध्ये संरक्षक भिंती व निवारा केंद्र उपलब्ध करुन देण्याची विनंतीही दरेकर यांनी यावेळी केली. नैसर्गिक आपत्तीसाठी आवश्यक असलेले बचाव साहित्य उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज संबंधित यंत्रणांना दिले.

अतिवृष्टीमुळे महाड व पोलादपूर भागातील परिस्थिती जलमय झाली होती. त्यामुळे भाजपचे नेते आमदार दरेकर यांनी दोन दिवसांपूर्वी महाड व पोलादपूर या भागांचा तातडीने दौरा केला. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला व तेथे तातडीने मदतकार्य देण्याच्यादृष्टीने तेथील जिल्हाधिका-यांना सूचना दिल्या. रायगड मधील महाड व पोलादपूर गावांमधील काही भागांमध्ये पूरप्रवण व दरडप्रवण परिस्थिती आहे.

पावसाळ्याच्या काळात या भागात वारंवार नैसर्गिक आपत्ती घडत असतात. विशेषत: मान्सून काळात रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे मान्सून काळात या जिल्ह्याला अनेक आपत्तीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. तथापि, पुरप्रवण, दरडप्रवण गावांमध्ये आपत्कालीन प्रसंगी अत्यंत महत्वाचे व आवश्यक शोध व बचाव साहित्य सहजपणे उपलब्ध असणे गरजेचे आहे. तरी, उद्‌भवणाऱ्या संभाव्य आपत्तीचा सामना करण्याच्या उद्देशाने आवश्यक शोध व बचाव साहित्याची देण्याची मागणी भाजपचे नेते दरेकर यांनी आज उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे.

महाड व पोलादूपर तालुक्याच्या नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आवश्यक साहित्याच्या मागणीपत्रकात एचडीपीई बोट, लाईफ जॅकेट्स, लँटर, सँटेलाईट फोन, हाय बीम सर्च लाईट, मल्टीपरपज फ्लोटिंगस्ट्रेचर, ड्रोन कँमेरे,जनरेटर्स, वॉकि टॉकी, अंडर वॉटर कँमेरा, फॉगिंग मशीन्स, बँटरी ऑपरेटर फ्लड लाईटस आदी प्रमुख साहित्यांचा समावेश आहे. तसेच आपत्तीच्या काळात त्या भागांमध्ये संरक्षक भिंती व निवारा केंद्र उपलब्ध करुन देण्याची विनंतीही आमदार प्रविण दरेकर यांनी याप्रसंगी केली आहे.


हेही वाचा : हिंदू देवी-देवतांचा अपमान करणाऱ्या चित्रपट निर्मात्यांचा शिरच्छेद करणाऱ्यास २० लाख रुपयांचे बक्षीस