बोईसर : पालघर जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेतील रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे एका गर्भवतीसह तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार डहाणू येथे बुधवार, 27 नोव्हेंबर रोजी घडला. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली जात आहे. (pregnant woman and baby die due to negligence of ambulance system)
पिंकी डोंगरकर असे मृत महिलेचे नाव असून ती डहाणू तालुक्यातील सारणी येथे रहात होती. मंगळवारी प्रसूती वेदना जाणवू लागल्यावर तिला उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला गुजरातच्या वलसाड रुग्णालयात हलवण्याचा सल्ला कासा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. त्यामुळे रात्रीपासून तिला वलसाड येथे हलविण्याचे प्रयत्न सुरू झाले. यासाठी 108 क्रमांकाच्या आपत्कालीन रुग्णवाहिकेची मदत घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु ऑक्सिजनसारख्या अत्यावश्यक सुविधा नसल्याने रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही. या विलंबामुळे गर्भवतीच्या जीवाला धोका निर्माण झाला.
हेही वाचा – Devendra Fadanvis : तुम्ही मुख्यमंत्री बनावे, कार्यकर्त्यांची इच्छा; प्रश्नावर फडणवीसांनी हातच जोडले
कासा उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. मात्र, डॉक्टर आणि उपचार सुविधा उपलब्ध नसलेल्या रुग्णवाहिकेतून पिंकीला नेणे चांगलेच महागात पडले. सुविधा नसलेल्या या रुग्णवाहिकेतून वलसाड येथे घेऊन जात असतानाच गुजरातच्या भिलाडजवळ पोहोचताच पिंकीचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. याआधीही आरोग्य व्यवस्था तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराचा फटका अशा अनेक गर्भवतींना बसला आहे. यातूनच त्या दगावल्याच्याही अनेक घटना समोर येत असतात. मात्र अनेक बळी गेल्यानंतरही सरकार याविषयी गंभीर नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
आपत्कालीन सेवा असूनही 108 उपलब्ध नाही?
108 रुग्णवाहिका ही जीवनावश्यक सेवा असूनही ती तात्काळ उपलब्ध होण्यात अडथळा निर्माण झाला. तर उधवा येथे रुग्णवाहिका असतानाही ऑक्सिजनच्या अभावामुळे ती पाठवण्यात उशीर झाला. अशा घटनेमुळे 108 सेवांच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रुग्णवाहिकांचा अभाव तसेच देखभाल – दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने रुग्णांना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका उपलब्धच होत नाहीत. अशावेळी गोरगरीब रुग्णांसह अशा गर्भवतींना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.
लाडकी बहीण योजना हीच का; माकप आमदार विनोद निकोले यांचा सवाल
पालघर जिल्ह्यात रुग्णवहिका व्यवस्थेच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती मातेचा आणि न जन्मलेल्या बाळाचा पोटातच मृत्यू होतो, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. यासंदर्भात यापूर्वी विधिमंडळामध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. आता मतदारांनी मला पुन्हा संधी दिली आहे. याबाबत पुन्हा विधिमंडळात या गंभीर विषयाबाबत आवाज उठवून याविषयी ठोस पावले उचलायला सरकारला भाग पाडणार असल्याचे, माकपाचे नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले यांनी सांगितले.
हेही वाचा –Eknath Shinde : माझी अडचण होणार नाही…; शिंदेंनी केला फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा
Edited by : Ashwini A. Bhatavdekar