घरमहाराष्ट्रलोकसभेच्या 48 जागांवर 'वंचित'ची तयारी; प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला सात दिवसांचा अल्टिमेटम

लोकसभेच्या 48 जागांवर ‘वंचित’ची तयारी; प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला सात दिवसांचा अल्टिमेटम

Subscribe

मुंबई : भाजपाविरोधात उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीचा भाग होण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने राज्यातील लोकसभेच्या 48 जागा लढविण्याची तयारी केली आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आपल्या निवडणूक तयारीची माहिती दिली. इंडिया आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला आघाडीबाबत पत्र दिले आहे. यासंदर्भात पुढील सात दिवसांत निर्णय घेऊन काँग्रेसने  उत्तर द्यावे, असा अल्टिमेटम देतानाच काँग्रेसने निर्णय न घेतल्यास लोकसभेच्या सर्व 48 जागा आम्ही लढवू, असा इशारा आंबेडकर यांनी दिला. (Preparation of Vanchit in 48 seats of Lok Sabha Seven days ultimatum to Congress from Prakash Ambedkar)

हेही वाचा – वेगवेगळ्या सुनावणीस ठाकरे गटाचा विरोध तर, शिंदे गटाकडून नियमांचं उल्लंघन; आजच्या सुनावणीत काय झालं?

- Advertisement -

वंचित बहुजन आघाडीची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती आहे. उद्धव ठाकरे यांचा पक्ष इंडिया आघाडीचा भाग आहे. वंचितने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून आघाडीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, काँग्रेसने या प्रस्तावाला अजून प्रतिसाद दिलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यास विरोध असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीतील आघाडीबाबत  काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला.

आमची शिवसेनेशी युती कायम आहे. परंतु, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. आघाडीचे जागावाटप झाल्यानंतर शिवसेना आणि वंचितच्या जागा वाटपाला सुरुवात होईल. त्यामुळे  शिवसेनेशी वाटाघाटी होत नाहीत, असे समजून आम्ही लोकसभेच्या 48 जागा लढविण्याची तयारी सुरु केली आहे, असे आंबेडकर यांनी घोषित केले. आम्ही सर्व महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार आहोत. पहिली सभा लातूर येथे होणार असून त्यानंतर सातारा, बीड, सटाणा (नाशिक) येथे सभा घेणार आहोत. निवडणुका कधीही लागू शकतात, हे गृहीत धरूनच आम्ही दौरे सुरु करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपाला मोठा धक्का; AIADMK ने सोडली साथ, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून निर्णयाचे स्वागत

उद्धव ठाकरे आणि आमचा एकमेकांवर भरोसा आहे. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अजूनही समझोता झालेला नाही आणि चर्चाही झालेली नाही. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन समझोता करायला पाहिजे तो दिसत नाही आहे. त्यामुळे त्यांच्यात समझोता न झाल्याने शिवसेनेच्या वाट्याला कोणत्या जागा येणार हेच अजून ठरलेले नसल्याने आमची बोलणी थांबली आहे, असेही आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आपण लोकसभेची आगामी निवडणूक अकोला मतदारसंघातून लढणार असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी जाहीर केले.

आदित्य ठाकरेंच्या प्रचाराला जाणार

दरम्यान, आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणुकीला उभे राहिले तर आपण त्यांच्या प्रचाराला जाणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्या आदित्य ठाकरे ठाण्यातून उभे राहिले तर मी त्यांच्या प्रचाराला जाणार. कारण युतीत असलो तर जावेच लागणार, युतीचा धर्म पाळला पाहिजे, असंही आंबेडकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -