घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेत जी -२०ची जोरदार तयारी; मुख्यालयात रंगरंगोटी अन् बंद कारंजे कार्यान्वित

मुंबई महापालिकेत जी -२०ची जोरदार तयारी; मुख्यालयात रंगरंगोटी अन् बंद कारंजे कार्यान्वित

Subscribe

मुंबई : मुंबईत जी – २० (G – 20) परिषदेच्या आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण कार्यगटाची (Disaster Risk Reduction Working Group) बैठक २३ ते २५ मे या कालावधीत होणार आहे. या बैठकीत सहभागी होणार देश- विदेशातील माहिती वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी हे मुंबई महापालिका मुख्यालयालात भेट देणार आहेत. ‘हेरिटेज वॉक’ करणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयात (BMC Head Office) गेल्या काही दिवसांपासून रंगरंगोटी, रस्त्याचे डांबरीकरण, भंगार हटविणे, जुने कारंजे सुरू करणे आदी कामांची जोरदार तयारी सुरू आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, २ मे रोजी जी – २० परिषदेसंदर्भात पूर्वतयारीबाबत महत्वाची बैठक घेतली होती. तसेच, या बैठकीसाठी आवश्यक रस्ते, स्वच्छता, सुशोभीकरण, आपत्कालीन व्यवस्था आदी कामे वेळेपूर्वीच पूर्ण करण्यात यावीत, असे आदेश त्यांनी संबंधित पालिका यंत्रणांना दिले होते. त्यादृष्टीने, मुंबई महापालिका मुख्यालयात सोमवारी सायंकाळच्या सुमारास आपत्कालीन विभाग, सुरक्षादल, पर्यवेक्षण विभाग, अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी आदींची ‘रंगीत तालीम’ घेण्यात आली. जी-२० निमित्ताने पूर्वतयारीचा भाग म्हणून मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी रस्ते दुरुस्ती, रंगरंगगोटी व सुशोभीकरणाची कामे जोरात सुरू आहेत.

- Advertisement -

यापूर्वी डिसेंबर २०२२मध्ये जी – २० परिषद पार पडली होती. जी – २०साठी येणाऱ्या पाहुण्यांच्या राहण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, २८ ते ३० मार्च या कालावधीतही ‘जी – २० परिषद’ पार पडली होती.

महापालिका मुख्यालयात जोरदार तयारी
पालिका आयुक्त चहल यांच्या आदेशाने, पालिका मुख्यालयात गेल्या काही दिवसांपासून रंगरंगोटीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. तसेच, मुख्यालय परिसरातील खडबडीत रस्त्याचे डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. प्रवेशद्वारात आकर्षक डिझाइन करून लादीकरणाचे काम करण्यात आले आहे. महापालिकेच्या इंग्रजकालीन जुन्या इमारतीच्या आवारातील बंद स्थितीतील कारंजे पुन्हा कार्यान्वित करण्यात आले आहे.

- Advertisement -

त्याचप्रमाणे, या कारंज्याच्या शेजारील जुन्या पंपिंग हाऊसच्या छताची डागडुजी करण्यात आली आहे. जुनी लाकडे तसेच कौले काढून नवीन लाकडे व कौले बसविण्यात आली आहेत. इमारतीच्या आवारातील भंगार सामानही हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरक्षा रक्षकांना जिरेटोप व मफलर परिधान करून त्यांचा गणवेश टापटीप करण्यात आला आहे. पालिका मुख्यालयाच्या नवीन इमारतीच्या शेजारील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या नवीन इमारतीच्या आवारात आपत्कालीन घटना घडल्यास मदतीसाठी अग्निशमन दलाचे फायर इंजिन तैनात ठेवण्यात आले आहे.

तसेच, पालिका मुख्यालयाच्या शेजारील वाहन पार्किंगची व्यवस्था शिस्तबद्ध करण्यात येत आहे. बिघडलेल्या वाहनांची जागेवरच दुरुस्ती करण्यात येत आहे. मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे, आपत्कालीन प्रशिक्षण देणारे तज्ज्ञ अधिकारी राजेंद्र लोखंडे, महापालिका जनसंपर्क विभागाचे प्रमुख अधिकारी तानाजी कांबळे, सुरक्षा दल, राजशिष्ठाचार विभाग व अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी हे पूर्वतयारीबाबत जातीने लक्ष देत असल्याचे निदर्शनास येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -