उद्यापासून महाराष्ट्रात पावसाची हजेरी; पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही मुसळधार पाऊस

कालपासून देशभरात मान्सून दाखल झाला असून येत्या काळात महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडू शकतो

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगलाच पाऊस चालू आहे. शिवाय आता मुंबई सोबतच कोकणातही पावसाचा जोर वाढला आहे. मात्र तरीही अजूनही काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यातील शेतकरी पेरणीसाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कालपासून देशभरात मान्सून दाखल झाला असून येत्या काळात महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडू शकतो.

4 जुलै पासून जोरदार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 4 जुलै पासून 6 जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाची सुरुवात होऊ शकते. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये 4 जुलै पासून मुसळधार पाऊस पडण्याती शक्यता वर्तवली जात आहे. या शिवाय मुंबई , मुंबई उपनगर , कोकण भागात सध्या बऱ्यापैकी पाऊस बरसत आहे. हा असाच चालू राहिल.

बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन
बुलढाणा जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून या जिल्ह्यातील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा भागात मुसळधार पाऊसाच्या सरी बरसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पेरणीची आतुरतेने वाट पाहणारे शेतकऱ्यांनी आता पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे.

जोरदार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड
सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सध्या मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली असून आता या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्या वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.