घरमहाराष्ट्रनाशिकस्वत:चे घर विकून आनंद ठाकूरांकडून शिवकालीन शस्त्रकलेचे जतन

स्वत:चे घर विकून आनंद ठाकूरांकडून शिवकालीन शस्त्रकलेचे जतन

Subscribe

लवकरच त्र्यंबकेश्वरमध्ये गुरुकुल तयार करणार

 नाशिक : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सर्वश्रुत आहे. हे शौर्य शिवाजी महाराजांनी ज्या शस्त्र कलेच्या माध्यमातून मिळवले, ती कला आजही शिवकालीन शस्त्रसंग्राहक व श्रीराम शिवकालीन मर्दानी खेळ आखाड्याचे आनंद ठाकूर यांनी जिवंत ठेवली आहे. ठाकूर यांनी देशभर भटकंती करत स्वत:चे फ्लॅट्स विकून कोट्यवधी रुपयांमधून शिवकालीन शस्त्रास्त्रे खरेदी केली असून, त्याव्दारे ते तरुणाईला शिवकालीन शस्त्रास्त्रे, युद्धनितीची माहिती देण्यासह प्रात्यक्षिके करुन दाखवत आहेत. ते दांडपट्टा, लाठीकाठी फिरवणे, चक्री फिरवणे, भाला, फरी गदगा, तलवारीचे प्रात्यक्षिकाचा खेळ वैशिष्ठ्यपूर्ण व चपळगतीने सादर करतात. त्यांच्या कार्याची दाखल घेत देशभरातील विविध संस्था व लोकप्रतिनिधींना त्यांना हजारो प्रशिस्तपत्रके, स्मृतीचिन्हे देवून गौरविले आहे.

आनंद ठाकूर यांनी दांडपट्टा, लाठीकाठी फिरवणे, चक्री फिरवणे, भाला, फरी गदगा, तलवारीचे प्रात्यक्षिकाचा खेळ वैशिष्ठ्यपूर्ण व चपळगतीने सादर करतात. त्यांना बालपणापासून मर्दानी खेळांची आवड आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण पंचवटीतील नवभारत विद्यालय, माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालय आणि अकरावी व बारावी पंचवटी कॉलेजमध्ये झाली आहे. सातवीमध्ये असताना ते तपोवनात संत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे सेवेकरी झाले. ते 1984 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये दिगंबर आखाड्यात सेवेसाठी गेले होते. ते जनार्दन स्वामींच्या मिरवणुकीत, गणेशोत्सव, ललित पंचमीमध्ये खेळ सादर करायचे. त्यांनी नाशिकमधील सहा फ्लॅट विकून एक कोटी रुपयांहून अधिक किंमतीमध्ये राज्यस्थान, उदयपूर, गोरखपूर, पंजाब, हरियाणा येथून स्वखर्चाने ४ हजारहून अधिक शस्त्रास्त्रे व दुर्मिळ वस्तू खरेदी केल्या. त्यातून त्यांनी मराठा साम्राज्यातील दुधारी तलवारी, मराठा धोप, वक्रधोप, राजस्थानी तलवार, चिलखत मोडणारे खंजीर, ढाल, कट्यार, भाला, नक्षीदार खंजीर, गुप्ती, धनुष्यबाण, दांडपट्टे, हातपट्टे, परशू, राजा-राणी तलवार, लाठी, काठी, बाण, चिलखत, टोप आदी युद्धात वापरली जाणारी शस्त्र, पुरातन काळातील कुलूप, जुने मापे, पूजेच्या वस्तू, राणीचा आरसा या साहित्यांचा स्वखर्चाने संग्रह केला आहे.

- Advertisement -

शिवशाही बाबासाहेब पुरंदरे, माजी खासदार उदयनराजे भोसले यांचे पाठबळ मिळाल्याचे ते सांगतात. शिवपुत्र संभाजी महानाट्य प्रयोगावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी ठाकूर यांनी केलेल्या संग्रह केलेल्या शस्त्रांची माहिती देत सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले. स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे, त्यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनीही त्यांचे कौतुक केले आहे. ठाकूर यांना माजी खासदार उत्तमराव ढिकले, माजी आमदार शोभा बच्छाव, गुरुपीठचे मोरेदादा, संत गाडगे महाराज संस्था, काळाराम मंदिर देवस्थान, दिगंबर आखाडा, निरमोही आखाडा, जगदगुरु वल्लभाचार्य महाराज, शांतीगिरी महाराज १०८, हरिदासबाब, रामपरमहंसबाबा, सोमेश्वरानंद महाराज, इंदोरचे रामनरेश आचार्य यांचे सहकार्य मिळाले आहे. त्यांना महाराष्ट्र पुरातत्व अभिलेख विभागाचे संचालक तेजस गर्गे, पुरातत्व विभाग, नाशिकचे सहाय्यक संचालक आरती आळे, जया वाहने, विलास वाहने यांच्यासह तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर गजभिये यांचे सहकार्य लाभले आहे.

ठाकूर यांची संकल्पना

  • शिवकालीन शस्त्रांचा खजिना मनापासून जतन आहे. ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेली पाहिजे.
  • बदलते तंत्रज्ञान, नव्या पिढीमध्ये व्हिडीओ ग्रेम व मोबाईल आकर्षणामुळे शिवकालीन मर्दानी खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या खेळांचे जतन होण्यासाठी राजाश्रयाची गरज आहे.
  • शाळा-महाविद्यालयीन अभ्यासक्रमात शिवकालीन कलेचा समावेश झाला पाहिजे.
  • ऑलिम्पिकमध्ये शिवकालीन युद्धकलेचे खेळ सादर झाले पाहिजेत. त्यामुळे जगभरातील नागरिकांना शिवाजी महाराजांची युद्धनिती समजेल.
  • नवीन पिढी व्यसनांच्या आहारी जावू नये, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये गुरुकुल तयार करणार आहे.
  • या ठिकाणी भारताच्या संरक्षणासाठी किशोरवयीन मुलामुलींसह तरुणाईला व्यायामाचे धडे, शिवकालीन खेळ शिकवणार आहे.
  • त्र्यंबकेश्वरमध्ये शिवकालीन शस्त्रास्त्रांसह वस्तूंचे संग्रहालय सुरु करणार आहे.
Sushant Kirve
Sushant Kirvehttps://www.mymahanagar.com/author/ksushant/
गेल्या १२ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. क्राईम, आरोग्य, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर लिखाण. शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी आणि जीवघेण्या अपघातांमध्ये घट होण्यासाठी सातत्याने लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -