घरताज्या घडामोडीPresident In Maharashtra : ब्रिटीशकाळ ते सत्ता स्थापनेची लगबग पाहिलेला दरबार हॉल...

President In Maharashtra : ब्रिटीशकाळ ते सत्ता स्थापनेची लगबग पाहिलेला दरबार हॉल कात टाकतोय, राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन 

Subscribe

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे मुंबईत दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राष्ट्रपती आहेत. या दौऱ्यामध्ये पहिला दिवस हा मुंबईतील राजभवन येथील दरबार हॉलच्या उद्घाटनाचा आहे. याआधी सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनामुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. ब्रिटीश काळातील पारतंत्र्य ते स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक दरबाराचा साक्षीदार असलेला हा दरबार हॉल पुन्हा एकदा नव्या रचनेसह आणि नव्या क्षमतेसह सज्ज झाला आहे. गेल्या काही वर्षात शपथविधीचा हॉल ही दरबार हॉलची नवी ओळख. मग मुख्यमंत्र्याचा शपथविधी असो वा महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे निमित्त, नव्या रूपातला हॉल आणखी एकदा कात टाकत महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी तयारीत आहे.

darbar hall

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेची स्थित्यंतरे असोत, अनेकदा आमदारांची शिरगणना असो वा महाराष्ट्र भूषणसारखा मानाचा पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा असो. हे सगळे बदल, सत्तांतरे आणि मानाचे सोहळे पाहिलेला साक्षीदार म्हणजे मुंबईच्या राजभवनातील साक्षीदार असलेला दरबार हॉल. खुद्द दरबार हॉलनेही अनेक नामांतरे पाहिली आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते न्यायाधीशांचा शपथविधी असो किंवा शिष्टमंडळाच्या बैठका अशा अगणित घटनांचा साक्षीदार असलेला दरबार हॉल आता नव्या रूपात आणि नव्या क्षमतेमध्ये सज्ज आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नव्या हॉलचे उद्घाटन होऊ घातले आहे. १०० हून अधिक वर्षांचा इतिहास असणाऱ्या  ज्या हॉलने पारतंत्र्यातील ब्रिटिशांचे दरबार पहिले तो हॉल एका सशक्त लोकशाहीतील स्थित्यंतरे पाहण्यासाठी नव्या दमाने पुनश्च सिद्ध झाला आहे. एका वास्तुपुरुषाचा पुनर्जन्म झाला आहे.

  

- Advertisement -

१०० वर्षांचा साक्षीदार 

जवळ जवळ १०० वर्षे ऊन पाऊस व समुद्रकिनारी उभा असल्याने वादळे व प्रचंड लाटांचे तडाखे सहन केल्यामुळे दरबार हॉलचा वास्तुपुरुष  गलितगात्र झाला नसता तरच नवल.  अनेकदा डागडुजी करून देखील त्याची वास्तू खचली, आतील लोखंड गंजले. मध्यंतरी दरबार हॉलला छोटीशी आग देखील लागली. कालांतराने त्याला असुरक्षित म्हणून घोषित केले गेले. दरबार हॉलची आसन क्षमता २२५ होती. कालांतराने ती कमी वाटू लागली व शपथविधी सोहळे राजभवनाच्या हिरवळीवर होऊ लागले. सन २०१७-१८ नंतर दरबार हॉलचा वापर पूर्णपणे थांबवला गेला व पुढे त्याठिकाणी नवा दरबार हॉल बांधण्याचा निर्णय झाला. सन २०१८ साली नव्या दरबार हॉलचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु प्रत्यक्ष बांधकाम २०२० साली सुरु झाले. मात्र नुकतेच सुरु झालेले बांधकाम करोना काळात ठप्प झाले आणि मोठ्या कालावधीनंतर ते पुन्हा सुरु झाले. जुन्या दरबार हॉलच्याच जागेवर आता ७५० आसन क्षमता असलेला नवा दरबार हॉल बांधून पूर्ण झाला आहे. राजभवनातील जुना ऐतिहासिक दरबार हॉल मोडकळीस आल्यामुळे त्या जागी अधिक आसन क्षमतेचा नवीन दरबार हॉल उभारण्यात आला असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या महाराष्ट्र भेटीमध्ये त्याचे उद्घाटन करणार आहेत. या निमित्त राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी दरबार हॉलच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. 

 

darbar hall

म्हणून दरबार हॉल उभारण्यात आला 

इंग्लंडचे महाराज पंचम जॉर्ज हे १९११ साली भारत भेटीवर आलेले पहिले-वहिले सर्वोच्च राष्ट्रप्रमुख होते. राजशिष्टाराच्या दृष्टीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.  मलबार हिलच्या गव्हर्नमेंट हाऊस येथे पंचम जॉर्ज यांच्या स्वागतासाठी दरबार हॉल बांधण्यात आला. त्याची वास्तुरचना देखील जॉर्ज विटेट यांचीच होती. दरबार हॉल येथे अधून मधून ब्रिटिश गव्हर्नर्सचे दरबार झाले असावे, परंतु निश्चित असा संदर्भ उपलब्ध आहे तो सन १९३७ साली झालेल्या दरबाराचा. गव्हर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांनी आपला कार्यकाळ संपत असताना मुंबईतील शेवटचा दरबार याच दरबार हॉल येथे आयोजित केला होता, अशी नोंदही आहे.  कालांतराने काँग्रेसने ब्रिटिश राजसत्तेला अनुकूल ठरेल अश्या कुठल्याही शाही समारंभात सहभागी होऊ नये असा ठराव पारित केला व मुंबई येथे १९३७ नंतर दरबार झाले नाही. सभागृहाला ‘दरबार हॉल’ हे नाव जे चिकटले ते मात्र आजतागायत कायम आहे.

दरबार हॉलची नामांतरे 


राजभवनात दरबार हॉलने काही नामांतरे देखील पहिली आहेत. सन १९५६ साली श्रीप्रकाश यांनी द्विभाषिक मुंबई राज्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली त्यावेळी या हॉलचे नाव ‘जलनायक’ होते असा संदर्भ आहे. पुढे जलनायकचे जल सभागृह हे नाव झाले. ते काहीही असले तरीही ‘दरबार हॉल’ म्हणजे शपथविधीचा हॉल असे जे समीकरण झाले ते आजतागायत कायम आहे. राज्यपाल मोहम्मद फजल (२००२-२००४) यांनी वसाहतवादी आठवणी पुसून टाकण्याचा चंगच बांधला होता. त्यावेळी त्यांनी दरबार हॉलचे नामकरण कॉन्फरन्स हॉल असे करवले. परंतु, त्यांचा कार्यकाळ संपल्यावर हॉलने पुनश्च आपले पूर्वीचे प्रचलित नाव धारण केले.

sharad Pawar

शपथविधीचा हॉल

राजभवन मुंबईच्या दरबार हॉल मध्ये मुख्यमंत्री, मंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुंबईचे नगरपाल (सन २००९ नंतर कुणीही नगरपाल झाले नाही), मुख्य माहिती आयुक्त, लोकायुक्त इत्यादी शपथविधी या ठिकाणी होऊ लागले. शासकीय बैठका, शिष्टमंडळांच्या भेटी, सांस्कृतिक सोहळे, पद्म पुरस्कार विजेत्यांचे सत्कार सोहळे, विविध देशांच्या राजदूतांच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी दरबार हॉल हे प्रतिष्ठित ठिकाण म्हणून नावारूपाला आले.  डॉ पी सी अलेक्झांडर  यांच्या काळात दरबार हॉलचे नुतनीकरण करण्यात आले त्यावेळी तेथे हेमा मालिनी यांच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम झाला होता.


महाराष्ट्र भूषणचा साक्षीदार

राजभवनातील दरबार हॉलने जशी सत्ता स्थापनेची लगबग पहिली आहे तशीच आमदारांची शिरगणती देखील ! भारतीय रेल्वेला १५० वर्षे झाली त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री नितीश कुमार यांसह याच दरबार हॉल येथून डेक्कन ओडिसीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले होते.  गेल्या काही वर्षांमध्ये  अनेकदा नामांतरे पाहिलेलाही हाच तो दरबार हॉल आता कात टाकतोय.  राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह बाबासाहेब पुरंदरे यांना याच सभागृहात ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान केला होता. दरबार हॉलने  अनेकदा शेतकऱ्यांचे सन्मान जसे पहिले तसे राष्ट्रपती पोलीस पदक दान सोहळे देखील अनुभवले आहेत.    


President tour Maharashtra : राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार २ दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -