गुन्हा मागे घेण्यासाठी महिला पोलिसाकडून दबाव; ‘या’ पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार

दिंडोरी : गंभीर गुन्ह्यांची तक्रार मागे घेण्यासाठी दिंडोरी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकार्‍याकडून दबाव टाकला जात असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्रास असहाय्य झाल्याने एका हॉटेल व्यावसायिकाने कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

दिंडोरी पोलीस ठाण्यात एक गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी व प्रशासनाचे स्नेह संबंध असणारा असल्याने खुद्द पोलिसांकरवी गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची तक्रारी निवेदन दिंडोरीतील एका हॉटेल व्यावसायिकाने दिली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट यांच्यामार्फत दबाव तंत्र वापरण्यात येत आहे. गेल्या 20 वर्षापासून दिंडोरी शहरात हॉटेल व्यवसाय करत आहे. दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाही. परंतु, माझ्यावर गुन्हा मागे घेण्यासाठी व माझ्या हॉटेल व्यवसायास बदनाम करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जेजोट येऊन दमबाजी करतात. त्यामुळे ग्राहकांना त्रास होत असून, मलाही मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये हॉटेलमध्ये चोरी झाली म्हणून 25 फेब्रुवारी 2022 व 13 एप्रिल 2022 रोजी गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलमध्ये दोनदा चोरी होऊनही कुठलीही कारवाई झालेली नाही. केसेस दाखल केल्याचा राग मनात धरून पोलीस उपनिरीक्षक जेजोट हॉटेलमध्ये येऊन दमबाजी करतात. त्यांच्याकडून मेहुणा व कुटुंब यांना दमबाजी केली जात आहे. पोलीस ठाण्यात रात्री 11 वाजता बोलविले जाते व रात्री 2 वाजेपर्यंत बसून ठेवले जाते. मला व माझ्या कुटुबियांना त्रास देण्यासाठीच जेजोट पोलीस ठाण्यात बसून ठेवतात. संबंधित जेजोट यांच्याविषयीपोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यावर तेथे कुणीही ऐकून घेत नाही. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न पडला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोनिका जेजोट यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

महिला पोलीस उपनिरीक्षक चर्चेत

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपींकडून तक्रारदाराला त्रास दिला जात असल्याचा प्रकार परिचित आहे. परंतु, एका महिलेच्या संर्दभात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल असताना तो गुन्हा मागे घेण्यासाठी एका महिला अधिकार्‍यांकडूनच दमबाजी करत असल्याच्या प्रकार प्रथमच चर्चेचा ठरला आहे. यावर कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक कोणता निर्णय घेतात, याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.