Sunday, May 2, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona दुसरी लाट ओसरताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांची...

Corona दुसरी लाट ओसरताच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांची बदली

Related Story

- Advertisement -

वाढत्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या चितांमुळे संपूर्ण महाराष्ट्र धुमसतोय. पण राज्याच्या आरोग्य यंत्रणेला या संकटकाळात खंबीर असे प्रशासकीय नेतृत्व मिळत नाही ही सध्याची ठाकरे सरकारसमोरील सर्वात मोठी नामुष्की आहे. त्याचाच परिणाम म्हणजे नाईलाजाने राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव पदावर डॉ. प्रदीप व्यास यांना कायम ठेवण्याशिवाय ठाकरे सरकारकडे सध्या पर्याय नाही. प्रशासनात सनदी अधिकार्‍यांमध्ये नकोसा असा विभाग म्हणजे आरोग्य विभागाची ओळख झाली आहे. पण महाराष्ट्राच्या जनतेला कोरोनाच्या लाटेत ढकलणार्‍या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवपदी असलेल्या डॉ. प्रदीप व्यास यांची लवकरच उचलबांगडी करण्यात येणार असल्याची माहीती एका उच्चपदस्थ सनदी अधिकार्‍याने आपलं महानगरला दिली. राज्यात आरोग्य यंत्रणेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी निर्णय प्रक्रियेत अपयशी ठरल्यामुळे अनेक कॅबिनेट मंत्र्यांची नाराजी डॉ. प्रदीप व्यास यांनी ओढावून घेतली आहे. कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर लगेचच डॉ. व्यास यांची बदली केली जाईल असेही तो अधिकारी म्हणाला. मात्र दुसरी लाट कधी संपेल अशी विचारणा केली असता लवकरच कोरोनाची लाट संपेल आणि राज्यभरात लावण्यात आलेले कडक निर्बंधही मागे घेतले जातील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील आरोग्य यंत्रणा अपग्रेड करण्याच्या मुद्यावर टिकेची झोड उडाल्यानंतर अखेर आरोग्य सेवेचे आयुक्त एन रामास्वामी यांच्यामार्फत मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे 743 कोटी रुपयांचा प्रस्ताव घाईगडबडीत शनिवारी पाठवण्यात आला, अशी माहिती मंत्रालयातील एका उच्चपदस्थ सनदी अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला दिली. डॉ. व्यास यांनी आरोग्य विभागात सलग पावणेपाच वर्षे काम केले आहे. त्यामुळेच त्यांचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. मात्र दुसरी लाट संपताच प्रदीप व्यास यांची नक्कीच बदली केली जाईल, असेही या अधिकार्‍याने सांगितले. मात्र, दुसरी लाट केव्हा संपेल? अजून किती बळी गेल्यावर व्यास यांची बदली करणार असा प्रश्न विचारताच लवकरच दुसरी लाट संपेल असे मोघम उत्तर या अधिकार्‍याने दिले. पण राज्यातील भयावह परिस्थिती पाहता डॉ. प्रदीप व्यास यांच्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट संपताच डॉ. प्रदीप व्यास यांची गच्छंती अटळ आहे, अशी माहितीही या अधिकार्‍याने दिली आहे.

२२ कॅबिनेट मंत्र्यांची नाराजी 

- Advertisement -

‘आपलं महानगर’ने आणि ‘माय महानगर’ने गेल्या काही दिवसांमध्ये आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या बेजबाबदार आणि संथ कारभाराच्या बातम्यांमधून अनेक गोष्टी मांडल्या होत्या. त्यामुळेच मंत्रालयातील अधिकार्‍यांनीच सोमवारी याबाबतचे स्पष्टीकरण देत ‘आपलं महानगर’ला फोन करून याबाबतची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रातील आरोग्य विभागाची भीषण अवस्था पाहता राज्याचा आरोग्य विभाग हा काम करण्यासाठी सनदी अधिकार्‍यांनाही नकोसा झाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात राज्याचे नेतृत्व करण्यासाठी एकही सनदी अधिकारी जबाबदारी घेत नाही. त्यामुळेच कोरोनाची लाट ओसरण्याचा सावध पवित्रा घेण्यात आल्याचे त्या अधिकार्‍याने स्पष्ट केले. डॉ. प्रदीप व्यास यांची बदली केली, तर मग नवीन अधिकारी कोण अशी ठाकरे सरकारच्या प्रशासनासमोर नामुष्की आहे. ठाकरे सरकारमधील 22 कॅबिनेट मंत्र्यांनी डॉ. व्यास यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. तसेच त्यांच्या बदलीचीही मागणी केली आहे. डॉ. व्यास कोणताच प्रतिसाद देत नसल्याने लोकप्रतिनिधींची नाराजी आहे. त्यामुळेच त्यांच्या बदलीची मागणी ही खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही मुख्यमंत्र्यांपासून ते शरद पवार यांच्याकडेही केलेली आहे. तर दुसरीकडे प्रशासनातील सनदी अधिकारी हे डॉ. प्रदीप व्यास यांची वारंवार पाठराखण करताना दिसून आले आहेत. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे डॉ. व्यास यांच्याविरोधातील काहीच ऐकून घेत नाहीत, अशी सध्या परिस्थिती आहे.

डॉ व्यास यांची प्रशासनातून पाठराखण

कोरोनाविरोधातील लढाईत जनतेमध्ये काम करताना स्थानिक प्रतिनिधींना येणार्‍या अडचणींवर मात करण्यापेक्षा डॉ. प्रदीप व्यास हे लालफितीतल्या कारभाराबाबत अधिक व्यस्त आहेत. त्यामुळेच लोकप्रतिनिधींची नाराजी ओढावण्याचे ते कारण बनलेले आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणेची कमकुवत झालेली परिस्थिती पाहता कठोर आणि जलद निर्णय घेण्याऐवजी त्यांच्या प्रशासकीय कारभाराच्या संथ वेगामुळे ते अनेकांच्या टीकेचे धनी झाले आहेत. म्हणूनच त्यांच्या बदलीची मागणी वारंवार होत आहे. डॉ. प्रदीप व्यास यांची प्रशासनातील प्रतिमा प्रामाणिक आणि पारदर्शक आहे. पेशाने ते डॉक्टर आहेत. त्यामुळेच आरोग्य विषयी त्यांच्याकडे भरपूर ज्ञान आहे अशी प्रशासनातील काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

अजुन किती बळी घेतल्यावर डॉ. व्यास यांची बदली ?

- Advertisement -

डॉ. प्रदीप व्यास हे मागील पावणेपाच वर्षांपासून आरोग्य खात्यात आहेत. त्यामुळे त्यांची कधीही बदली करणे शक्य असताना सरकार कोरोनाची दुसरी लाट थांबण्याची वाट बघून अजून किती जणांचे बळी घेणार? कोरोनाच्या महामारीत आतापर्यंत मागील १४ महिन्यांत लाटेत ६४,७६० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ऑक्सिजन प्लान्ट वेळेत स्थापन झाले असते, रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य साठा पेशंटना मिळाला असता तर किमान आपण किमान चार हजारपेक्षा जास्त रूग्णांचे प्राण वाचवू शकलो असतो, अशी खंत एका कॅबिनेट मंत्र्याने दै. ‘आपलं महानगर’कडे सोमवारी बोलून दाखवली.


 

- Advertisement -