पंतप्रधानांनी राणेंचा राजीनामा घ्यावा : बडगुजर

राणेंची मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अर्वाच्च्य भाषा

Sudhakar Badgujar

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अर्वाच्च्य भाषा वापरुन शिवसैनिकांना चिथावणी देत आहेत. अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा मागितला पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी केली.

बडगुजर म्हणाले, केंद्रीय मंत्र्याला शपथ देताना कोणत्याही राज्याविषयी, नेत्याविषयी आकस बाळगणार नाही, अशी शपथ दिली जाते. नारायण राणे यांनी त्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला सांगावा, असे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले. राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या रुपाने चांगले काम करण्याची आणि राजकीय भविष्य सुधारण्याची संधी मिळाली होती. परंतु, नारायण राणे यांनी ती संधी वाया घालवल्याचा आरोपही त्यांनी केला.