घरमहाराष्ट्रशहिदांच्या नावाने मोदींनी मागितला लातूरमध्ये मतांचा जोगवा

शहिदांच्या नावाने मोदींनी मागितला लातूरमध्ये मतांचा जोगवा

Subscribe

पाण्याची भीषण टंचाई असणाऱ्या आणि दुष्काळ वर्षानुवर्षे वाढतच असणाऱ्या लातूरमध्ये मंगळवारी युतीची जाहीर सभा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आले होते. यावेळी बालाकोट आणि पुलवामामधल्या शहीदांच्या नावाने मोदींनी उपस्थित लातूरवासीयांकडे मतांचा जोगवा मागितला. ‘या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदारांनी त्यांचं पहिलं वोट पुलवामा आणि बालाकोटमधल्या शहीदांना समर्पित करा. तुमचं प्रत्येक मत थेट मोदींना मिळेल’, असं यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विरोधकांचा जाहीरनामा, शरद पवार यांच्यावर टीका केली.

घरात घुसून मारू हे भारताचं धोरण

यावेळी बोलताना मोदींनी पुलवामा हल्ला आणि त्यानंतरच्या एअर स्ट्राईकचा उल्लेख केला. ‘घरात घुसून मारण्याचं भारताचं धोरण आहे. आजकाल ही लोकं माझ्या मागे पडली आहेत. मला म्हणतायत भारतानं पाकिस्तानचं कोणतंही विमान पाडलं नाही. ही लोकं माध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी हे करतात. ज्यांना आपल्याच सैनिकांवर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना तुम्ही शिक्षा द्यायला हवी’, असं ते म्हणाले. तसेच, ‘नवमतदारांनी त्यांचं मत पुलवामा-बालाकोटमधल्या शहीदांना समर्पित करावं’, असंही ते यावेळी म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार तुम्हीसुद्धा?

दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. ‘काँग्रेसचं ठीक आहे, त्यांना कळत नाही. पण शरदराव तुम्हीसुद्धा? जम्मू-काश्मीरला स्वतंत्र पंतप्रधान हवा असलेल्या लोकांसोबत काँग्रेस-राष्ट्रवादी उभी राहणार आहे. काँग्रेसवाल्यांना अक्कल नाही. पण शरदराव तुम्हीसुद्धा? शरद पवारांना हे शोभत नाही’, असं ते म्हणाले.

जाहीरनाम्यातल्या तरतुदींचा वाचला पाढा

यावेळी मोदींनी शेतकऱ्यांना पेन्शन, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे, छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना, प्रत्येक गरिबाला पक्कं घर, असंघटित क्षेत्रातली मजुरांना पेन्शन अशा जाहिरनाम्यात जाहीर केलेल्या योजनांचा पुनरुच्चार केला.

- Advertisement -

आम्ही सर्जिकल स्ट्राईक करून दाखवला

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेण्याची घोषणा केली. ‘आम्ही २०१४मध्ये जाहीरनाम्यात सर्जिकल स्ट्राईक करू अशी घोषणा केली नव्हती. पण वेळ पडली, तेव्हा आम्ही ती जादू देखील करून दाखवली’, असं यावेळी मोदी म्हणाले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका

‘जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटलंय, तीच भाषा पाकिस्तान देखील बोलतंय. काँग्रेस म्हणतंय आफ्स्पा मागे घेऊ, पाकिस्तानला देखील हेच हवंय. देशद्रोहाचा कायदा रद्द करणार असल्याचं काँग्रेस म्हणते. पाकिस्तानला सुद्धा हेच हवंय. पण काँग्रेसची पद्धत आहे दिलेली आश्वासनं पूर्ण न करणं आणि आमची विशेषता आहे आश्वासनं पूर्ण करणं. काँग्रेसचा ढकोसलापत्र फक्त मतांसाठी आहे, तर आमचं संकल्पपत्र मतदारासाठी आहे’, असं मोदी यावेळी म्हणाले. ‘काँग्रेसला अक्कल असती आणि १९४७मध्ये ठाम राहिली असती की आम्ही देशाचे तुकडे होऊ देणार नाहीत, तर पाकिस्तान आज जन्मालाच आला नसता. काँग्रेसच्या तोंडी मानवाधिकाराच्या गोष्टी शोभत नाहीत’, असं देखील ते म्हणाले. दरम्यान, ‘काँग्रेसवाल्यांनीच बाळासाहेब ठाकरेंचं नागरिकत्व, मतदान करण्याचा अधिकार हिसकावून घेतला होता’, असं म्हणत त्यांनी शिवसेनेच्या मतदारांना देखील चुचकारण्याचा प्रयत्न यावेळी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -