अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याधापकाला बेदम चोप

bhiwandi molestation case
पीडित मुलीच्या नातेवाईकांनी विकृत मुख्याध्यापकाला चोप दिला.

भिवंडीतील शेलार नदीनाका येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी वर्गातच विकृत मुख्याधापकाने अश्लील चाळे करून तिच्याशी लगट करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संतप्त नागरिक आणि पीडित विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी विकृत मुख्याध्यापकाला या घटनेचा जाब विचारत चांगलाच चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका पोलिसांनी या प्रकरणी तातडीने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून मुख्याध्यापकास गजाआड केले आहे. प्रमोद नायक (३५) असे विकृत मुख्याधापकाचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा विकृत त्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी एकतर्फी प्रेम करीत असल्याचा प्रकार चौकशीत समोर आला आहे. गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली असून या विकृत मुख्याधापकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.

भिवंडी – वाडा रोडवरील शेलार गावात हिंदी माध्यमिक शाळा असून या शाळेत १४ वर्षाची पीडिता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी प्रमोद हा पीडितेवर एकतर्फी प्रेम करीत होता. ३ दिवसांपूर्वीच त्याने तिला शाळेच्या मैदानात गाठून मुख्याधापक कार्यलयात येण्यास सांगितले. मात्र पीडिता गेली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याने तिचा वर्ग सुरु असताना शिपायामार्फत निरोप पाठवून तिला त्याच्या कार्यालयात बोलावले. मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणून त्याने तिच्याशी वर्गात अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

या घृणास्पद प्रकाराने भयभीत होऊन पीडित मुलीने घरी येऊन घडलेला प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. आईने नातेवाईकांसह गुरूवारी सकाळी शाळेत धाव घेऊन त्याला गाठले आणि घडलेल्या प्रकाराचा जाब विचारला. मात्र त्याने उद्धट वर्तन केल्याने पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन त्याला चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुख्याध्यपकाला ताब्यात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल करून गजाआड केले आहे.