Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र शिक्षकदिनीच जिल्हा परिषदेच्या शाळेतील 'मुख्याध्यापक तर्राट'

शिक्षकदिनीच जिल्हा परिषदेच्या शाळेतील ‘मुख्याध्यापक तर्राट’

Subscribe

नाशिक : शिक्षकदिनाचे औचित्य साधून एकीकडे शाळा-शाळांमधून जीवनाला दिशा दाखवणार्‍या शिक्षकांप्रती ॠणनिर्देश व्यक्त केले जात असतांना दुसरीकडे दिंडोरी तालुक्यातील धागुर जुने येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत चक्क मुख्याध्यापकच दारू पिऊन शाळेत ‘अवतरले’. अक्षरश: झिंगत आलेल्या या मुख्याध्यापकाला धड चालताही येत नव्हते. अखेर गावकर्‍यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या मदतीने या मुख्याध्यापकाचा भांडाफोड केला. संपूर्ण गाव गोळा झाल्याने या मुख्याध्यापकाने लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून पळ काढला. या मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.

‘गुरुविना कोण दाखविल वाट’ असे म्हटले जाते. मात्र कलयुगातील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांनी नक्की कोणता आदर्श घ्यावा असा प्रश्न पडेल अशी परिस्थिती काही प्रकरणांत निर्माण होते. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत समोर आला आहे. यागेश गायकवाड असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. दिंडोरी तालुक्यातील धागुर जुने येथील जिल्हा परिषद शाळेत हे महाशय मुख्याध्यापक आहेत तसेच इयत्ता तिसरी आणि चौथीच्या वर्गांनाही ते शिकवतात.

- Advertisement -

मंगळवारी सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जात असतांना हे महाशय सकाळी शाळेत येतांना ‘फुल टू’ होऊन आले. झिंगत झिंगत आलेल्या या मुख्याध्यापकाने आपल्या दालनात जात नशेतच कामकाजालाही सुरूवात केली. गावकर्‍यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी शाळेत जात या मुख्याध्यापकांना या वागणूकीचा जाब विचारला. यावेळी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे या शाळेत धाव घेत या मुख्याध्यापकाचा भांडाफोड केला. केंद्र प्रमुखांनाही तक्रार करण्यात आली; मात्र यापूर्वी या मुख्याध्यापकांना वारंवार ताकीद देऊनही असले प्रकार सुरूच असल्याचे सांगत केंद्रप्रमुख ठाकरे यांनी हतबलता दर्शवली. सदरचा प्रकार कॅमेर्‍यात कैद करण्यात आला आहे. या प्रकारानंतर मुख्याध्यापकाने गावकर्‍यांची माफी मागत शाळेतून धूम ठोकली.

अशा प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा अविश्वासास पात्र झाल्या आहेत. त्यामुळेच पालकांना खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे अशावेळी गोरगरिब जनतेला महापालिका, जिल्हा परिषद शाळांमधून चांगले शिक्षण मिळावे ही अपेक्षा असते. परंतु शिक्षकांच्या अशा वागणूकीमुळे शिक्षणाचा बाजार मांडलेल्या शिक्षण सम्राटांच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे हे अपयशच म्हणावे लागले. जर सुसंस्कृत भावी पिढी घडवायची असेल तर शिक्षकांनाही अभ्यासुवृत्तीने काम करावे लागेल. सदरच्या प्रकाराबाबत गायकवाड यांना बडतर्फ करण्याची मागणी करत आहोत. : जितेंद्र भावे, अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी

जिल्हा परिषद शाळेची अब्रु वेशीवर

एकीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल या शिक्षणबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे यापैकीच ‘सुपर १००’ हा एक उपक्रम. मात्र विद्यार्थी घडवतांना शाळेचे मुख्याध्यापकच असे दारू पिऊन शाळेत येणार असतील तर विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यायचा तरी कोणाचा. या प्रकारावरूनच जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा कारभार उघड झाला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण व्यवस्थेवर मित्तल यांचा वचक नसल्याचेच यावरून दिसून आले.

हा मुख्यध्यापक शाळेत येताना दरवेळी दारू पिऊन येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या दोन वर्षापासून या मुख्यध्यापकाला समजावून सांगत आहोत. वारंवार केंद्रप्रमुखांना तक्रारही केली. ग्रामसभेसमोरही हा मुद्दा चर्चेत आला. मात्र प्रत्येकवेळी समज देऊनही या सरांचा हा प्रताप सुरूच आहे. आमच्या मुलांनी काय आदर्श घ्यावा. : कैलास बेंडकोळी, ग्रामस्थ

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -