पावसाळ्यात रेल्वेवाहतूक सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करा; पालिका आयुक्तांच्या सूचना

संग्रहित

ठाणे : ठाणे महापालिका (Thane Municipal Corporation) हद्दीत धावणारी रेल्वेवाहतूक (Railway service) पावसाळ्यात सुरळीत राहण्यासाठी आवश्यक असलेली नालेसफाई तसेच रेल्वेरुळानजीक येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच कामे प्रधान्यांनी करावी. तसेच, रेल्वे आणि पालिका या दोन्ही यंत्रणांनी यावेळच्या पावसाळ्यात अधिक सतर्क राहावे, अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केल्या आहे.

मुलुंड ते दिवा या पट्ट्यातील सर्व नाल्यांची काळजीपूर्वक सफाई केली जावी. रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाई, गटारे सफाई करताना मशीन उतरवणे शक्य होत नाही, तेथे मनुष्यबळाचा वापर करून गाळ काढला जावा, अशी सूचना आयुक्त बांगर यांनी केली. तसेच नौपाडा आणि कोपरी येथे रेल्वेरुळांवर पाणी येऊ नये म्हणून पट्ट्या टाकल्या जातात, त्यामुळे पाणी तेथे अडून माघारी येते. तथापि, पाणी वाहून जात असेल, तेव्हा पट्टी टाकू नये, असे ठाणे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. याच भागात छोटे भुयारी गटार केले तर, ठाणे यार्डमधील पाणीसाठण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तर, कोपरी येथील चिंधी मार्केटमधील कचरा रेल्वेहद्दीत टाकला जातो, त्यामुळे आतील गटारे तुंबतात, हेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. त्याअनुषंगाने भुयारी गटार बांधण्यासाठी नियोजन पावसाळ्यात करून घ्यावे आणि पावसाळा संपला की बांधकाम करावे, असे आयुक्तांनी सांगितले. तसेच, चिंधी मार्केटमधील कचऱ्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.

वाघोबा नगर, भास्कर नगर येथील अतिक्रमणामुळे रस्ता खचला आहे. कुंपण भिंतीच्या वर असलेली बांधकामे रेल्वेसाठी धोकादायक ठरू शकतील. या भागाची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही आयुक्तांनी दिले. तसेच, हे काम पावसाळ्यानंतर होणार असल्याने रेल्वे आणि पालिकेने यंदाच्या पावसाळ्यात अधिक सतर्क राहावे, असेही आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले.

याशिवाय पारसिक बोगद्यावरील काही झाडेही धोकादायक झाली आहेत, तर रेल्वेलगतच्या इमारतींमधील सुमारे 72 झाडांच्या फांद्या रुळांवर येत आहेत, त्यांची छाटणी लवकर व्हावी, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगताच, उद्यान विभागाने हे काम प्राधान्याने करावे, असे आयुक्तांनी सांगितले.