राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून मुकुल वासनिक का नाहीत?, हायकमांडच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाणांची नाराजी

बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षवाढीच्या दृष्टीने फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे.

Congress leader Prithviraj Chavan's first reaction to Sanjay Raut's statement

महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उत्तर प्रदेशमधील नेते इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिल्यामुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी उफाळली आहे. बाहेरचा उमेदवार लादला म्हणून आशिष देशमुख यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आपल्या प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील हायकमांडच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या कॉंग्रेसच्या कोट्यातील एका जागेवर मुकुल वासनिक यांच्या ऐवजी उत्तर प्रदेशातील इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिली असून वासनिक यांना राजस्थान मधून उमेदवारी देण्यात आली आहे. हायकमांडच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आशिष देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोनिया गांधी यांना पाठविला आहे.

बाहेरचा उमेदवार लादल्याने पक्षवाढीच्या दृष्टीने फायदा होणार नाही. महाराष्ट्रातील सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर हा अन्याय आहे. एक निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून मी काँग्रेस पक्षासोबत काम करत राहीन आणि वचनबद्धतेची पूर्तता करीन, असे देशमुख यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांची हायकमांडच्या निर्णयावर नाराजी

माजी मुख्यमंत्री आणि सोनिया गांधी यांच्या विश्वासातील नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यासंदर्भात आपली नाराजी उघड केली आहे. प्रतापगडी यांच्या ऐवजी केद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील जेष्ठ कॉंग्रेस नेते मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून उमेदवारी द्यावयास हवी होती, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : भविष्यात सुळे महिला मुख्यमंत्री तर राऊत राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री, मनसेचा खोचक टोला