घरमहाराष्ट्रपृथ्वीराज चव्हाण भाजपच्या विरोधात लढणारे नेते, नाना पटोले यांचा पलटवार

पृथ्वीराज चव्हाण भाजपच्या विरोधात लढणारे नेते, नाना पटोले यांचा पलटवार

Subscribe

मुंबई : पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी काम केले आहे. भाजपाच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची क्षमता असलेले ते नेते आहेत आणि त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना टोला लगावला.

भाजपाच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना, आपल्या पक्षात त्यांचं काय स्थान आहे… ते ए आहेत की, बी आहेत की, सी आहेत हे आधी तपासावे”, असे पवार म्हणाले. त्यामुळे, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचे मोठे नेते असल्याचे सांगत नाना पटोले यांनी पलटवार केला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यात आम्ही लुडबुड करण्याचा प्रश्न नाही. आमच्यासाठी जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही लढत आहोत. कोणाच्या पक्षात काय चालले आहे हे पहाणे आमचे काम नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

नाना पटोले हे मंगळवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना नाना पटोले यांनी कर्नाटक निवडणुकीवरून (Karnataka Assembly election) भाजपावर जोरदार टीका केली. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. त्यामुळे तेथे ऑपरेशन लोटस करण्याची वेळच भाजपावर येणार नाही. जनताच भाजपाचे ऑपरेशन करणार आहे, असा टोला पटोले यांनी लगावला. कर्नाटकात भाजपची अवस्था नॅनो कारमध्ये बसावे लागेल अशी होईल, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

- Advertisement -

…म्हणून केरला स्टोरीचा आधार
कर्नाटकमध्ये भाजपाला पोषक वातावरण नसल्याने त्यांनी केरला स्टोरी चित्रपटाचा आधार घेत जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपाच्या अशा कोणत्याच भूलथापांना कर्नाटकची जनता बळी पडणार नाही. काश्मीर फाइल्स चित्रपटाचे भांडवल करत भाजपाने काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत असल्याचा डांगोरा पिटला. काश्मीरमध्ये राज्यपाल आहेत, केंद्रात भाजपाची सत्ता आहे, मग काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी काय केले? असा सवाल करत पटोले यांनी, ते सत्तेत असतानाच काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढल्याचे सांगितले.

बजरंग बलीच्या नावावरही मते मागण्याचा प्रयत्न
मणिपूरमध्येही भाजपची सत्ता आहे. पण तेथे दोन जनसमुदायात मोठा संघर्ष पेटला आहे. मणिपूर जळत असताना देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री मात्र कर्नाटकात मताचा जोगवा मागत फिरत आहेत. भाजपाने बजरंग बलीच्या नावावरही मते मागण्याचा प्रयत्न केला. पण तो मुद्दाही कर्नाटकात चालला नाही. बजरंग बलीचा आशीर्वाद काँग्रेसबरोबर आहे. कर्नाटकात काँग्रेसचेच सरकार येणार आहे, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात भाजपाकडून आमदारांची खरेदी
भाजप खोटारडा पक्ष असून एनकेन प्रकारे सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मागील विधानसभा निवडणूक निकालानंतर कर्नाटमध्ये काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसने सत्ता स्थापन केली होती. परंतु जनतेचा कौल भाजपा मान्य करत नाही त्यांच्याजवळ सीबीआय, ईडीसारख्या सरकारी यंत्रणा आहेत. या सरकारी यंत्रणांचा मोदी सरकार सत्तेसाठी दुरुपयोग करत असते, हे देशातील जनतेने पाहिले आहे. महाराष्ट्रातही आमदारांची खरेदी करून भाजपने महाविकास आघाडीचे सरकार पाडले, असा आरोप पटोले यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -