उद्धव ठाकरेंनी घाईगडबडीत राजीनामा दिला, ही… – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj chavan

आज शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी 29 जुलै पर्यंत वेळ दिला असून या प्रकरणातील पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद झाला. यानंतर कोर्टाने सुनावणी 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घाईगडबडीमध्ये राजीनामा दिला, ही फार मोठी चूक केली आहे. विधिमंडळामध्ये जाऊन त्यांनी भाषण केले पाहिजे होते. आपले मत काय, काय परिस्थिती झाली, काय आरोप झाले, हे सर्व अधिकृतपणे सदनामध्ये सांगायला पाहिजे होते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले  –

कोर्टात झालेल्या सुनावणीवर आम्ही नक्कीच समाधानी आहोत. कारण आमची बाजू भक्कम आहे. प्रकरण न्यायालयात असल्याने यावर मी अधिक बोलणार नाही. मात्र, न्यायाधीशांनी हे प्रकरण संविधान पीठाकडे जावे का याबाबतचे महत्वाचे विधान केले आहे. त्यामुळे यासंदर्भात १ ऑगस्टला काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.